पान:मी भरून पावले आहे.pdf/48

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मग त्यांना माझ्या पगारातनं चारदोन कपडे शिवले. बाबांची सारखी पत्रं की, तुम्ही या इकडे म्हणून. बाबा म्हणजे माझे सासरे. ते म्हातारे होते. ते लग्नाला येऊ शकले नव्हते. मग आम्ही एक दिवस चिपळूणची तिकिटं काढली आणि गावी गेलो.

 एस.टी.चा प्रवास मी कधी आधी केलेला नव्हता. खड्डे-खुड्डे, सगळं धुळीनं माखलेलं. आम्ही गावी गेलो तेव्हा पावसाचे दिवस होते. खूप पाऊस नव्हता पण पावसाचेच दिवस होते. आणि तिथं पोचलो तर डोंगरावर आमचं घर. डोंगरावर अशा पायऱ्या काढलेल्या आणि वर आमचं घर. काही लोकांची खाली, काही लोकांची डोंगरावर. सगळा गाव लोटलेला होता. एस.टी.तून आम्ही चिपळूणला उतरलो. चिपळूणहून मिरजोळीला जायला टॅक्सी केली. टॅक्सीमधून आम्ही उतरलो तर सगळे गाववाले गोळा झालेले. तीस घरं दलवाई फॅमिलीची तिथं होती. सगळे आपसात जोडलेले, सगळे जवळजवळ राहणारे. हमीदखानचं लग्न म्हणजे काय? गाजलेलं लग्न होतं. बाहेरची मुलगी आणि तरी सगळे कागदाच्या फुलांचे हार घेऊन आले होते. तिथं खरी फुलं मिळायची नाहीत. कागदांचे हार उतरल्याबरोबर सगळ्यांनी घातले. आम्हांला बरोबर घेतलं. वर चढलो. बाबा आणि सगळी आमची फॅमिली. तीन नणंदा. तेव्हा ही चौथी बायको होती दलवाईंच्या वडिलांची, ती होतीच. तिला तीन मुलं. तर अशी मला उभी केली बाबांनी आणि मला जवळ घेऊन सांगितलं, हे बघ ह्या माझ्या जशा मुली आहेत ना, तशी तू माझी मुलगी आहेस. तुला सून म्हणून घरात घेणार नाही, तर माझी मुलगी म्हणून घरात घेईन. तू काहीही काळजी करू नको. मी आहे ना, असं म्हणून जवळ घेतलं. ते पडलेलं शेणामेणाचं घर, लाईट नाही. मी असं घर कधी पाहिलेलं नाही. पाणी नाही. जमीन मातीची. माणसं इतकी गलिच्छ. कपडेच नाहीत अंगावर त्यांच्या. एक जोड कपडा असे. सगळं असं आणि मग थोडा वेळ ना, मला असं झालं का बापरे मी कुठल्या कुठे आले? मी घोडचूक केलेली आहे. आता मी पळून कुठे जाणार? कोण मला आसरा देणार? क्षणभर माझ्या डोक्यातली हवाच निघून गेली होती. मला वाटलं लग्न म्हणजे आपण काही तरी मोठी चूक केलेली आहे. आपण नको तिकडे आलो आहोत. संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही घरात गेलो. घरात पाली दिसतात. तिकडे झुरळं दिसतात. कोण म्हणतं विंचू येतात, साप येतात. सगळंच तसं. मी रात्र तर काढली तशीच. त्यांनी एक रूम दिली होती आम्हांला. जरा मच्छरदाणी-बिच्छरदाणी होती म्हणून घाबरायला झालं नाही. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून गावातली लोकं यायला सुरुवात झाली.

३२ : मी भरून पावले आहे