पान:मी भरून पावले आहे.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खरं बोलायचं डेअरिंग नाही म्हणून मी खोटं बोलते याची जाणीव मला होती. भिऊन मी घरात बोलायची नाही आणि त्याच्यानंतर उषाने आईला सांगितलं की माझ्या घरी बैठक ठेवू या. तुम्ही तिथं या, मुलगा बघा आणि मग आपण ठरवू या. दोनतीनदा त्यांनी टाळलं. त्याच काळामध्ये कराचीहून माझी एक मावशी आली होती. ती माझ्या बाजूची होती. त्यामुळे तिला पण मी सगळं सांगितलं. की असं असं आहे आणि तू आईला तयार कर. मावशीनं आईला असं नाही दाखवलं की मी तिला असं सांगितलं. ती बोलली. “काय हरकत आहे? जा बघायला." आणि आईच्या मनात जर माझ्या लग्नाचं असतं तर ती मावशीला पण बोलली असती की चल जाऊ या, नाही तर घरी बोलवू या. तसं तिने केलं नाही आणि ती टाळत गेली. नंतर मावशी निघून गेली, का तर मग त्यांच्यामध्ये जरा बोलाचाली झाली. त्यामुळे मावशी निघून गेली. तिला वाटलं की बाबा, मी काय करणार ह्या गोंधळात. आणि मग एकदा भेटायला आई गेली उषाकडे.
 वडिलांना कोण मध्ये पडू देतं? आई जे करेल ते खरं ना. तसा वडिलांचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आई एकटीच गेली. मला सांगितलं नाही तिने.
 दलवाईंना उषानं बोलावलं होतं बैठक ठेवली होती तिथं. आणि तिथं भेट करून दिली. गेल्यानंतर आमच्या आईचं इंप्रेशन चांगलं झालं नाही. तिला वाटलं कोणी तरी मोठा जज, वकील असेल. पैसेवाला असेल, गाडी घेऊन आला असेल अशी तिची कल्पना झाली. आणि एकीकडे तर बोलायची की मुलगी किरकोळ आहे. तिचं लग्न कसं होणार? आणि दुसरीकडे तर अशी अपेक्षा ठेवायची, हे चुकीचं होतं. तिनं तिथं क्रॉस एक्झामिन केलं त्यांना. तुमचं शिक्षण एफ.वाय. पर्यंत झालं. पुढं का नाही शिकलात? खादी घालायचं कारणच काय तुम्हांला? खादीशिवाय तुम्हांला चांगले कपडे मिळाले नाही का? असं त्यांच्या गरिबीवर सारखा रोख ठेवला.
 असं केल्यामुळे त्यांना वाईट वाटलं. पण तो मनुष्य खूप सुधारलेला असल्यामुळे त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. उलट उत्तर दिलं नाही. त्यांनी पण चेष्टेनं सगळं घेतलं. कारण मी मनासमोर होते ना. लग्नानंतर ते या इंटरव्ह्यूबद्दल लोकांना आपल्या सवयीप्रमाणे खूप सांगत असत. "बापरे, माझ्या सासूने जो माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे तो ऐकण्यासारखा आहे." आणि टिंगलीला त्यांना तो एक विषय झाला.

 आई उषाला म्हणाली, 'काय मुलगा बघितला? काय तरी बघायचं होतं.

२४ : मी भरून पावले आहे