पान:मी भरून पावले आहे.pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चांगला बघायचा होता. आता मेहरूला जर कळलं की तू असा मुलगा दाखवला आहेस तर तिला बिचारीला किती वाईट वाटेल?' उषाचा चेहरा पडला. वाईट वाटलं तिला की काय मी वाईट मुलगा दाखवलाय? तर ती आईला म्हणाली, "तुम्ही मेहरूची काळजी करू नका. मेहरूनं मुलगा बघितलेला आहे आणि तिला आवडलेला आहे. म्हणूनच तुम्हांला मी इकडे आणलंय." फाटकन् तिनं असं सांगितल्यावर आईला संताप आला. ती आली घरी. तणतण करत मला म्हणाली, तू त्या मुलाला भेटल्यावर मला सांगितलेलं नाहीस. कितीदा भेटली? कुठे गेली होती? काय तो दिसायला आहे? काय त्याच्यात आहे? काय डोळा त्याचा चकणाय. डोळेसुद्धा चांगले नाहीत त्याचे. दात बाहेर आलेले. तर मी म्हटलं, नाही बुवा, मला नाही दिसलं तसं. ती म्हणाली, 'अग काय, तुला काय वाटतंय, तुझ्यावर प्रेम करतोय तो म्हणून? तुझ्या नोकरीवर तो भाळलाय.' कशावर तरी भाळणारच कोणी तरी. असं काय आपल्यामध्ये आहे? काही नाही. त्यामुळे मी तिला काही प्रति उत्तर केलं नाही, काही केलं नाही. तिला काही बोलले नाही. सोडून दिलं मी आणि मग माझ्या लक्षात आलं की हिच्या मनात माझ्या लग्नाचं नाहीए. वडिलांकडे मग माझ्या ऑफिसमधले त्यांचे मित्र सुळे गेले. सुळेंनी सांगितलं, पटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वडील पण म्हणत होते, हो हो. आईला विचारून करू. मग म्हणाले, की फोटो आणा. फोटो दाखवा. घरात दाखवतो. आजीनं तिला सांभाळलंय. त्या आजीला विचारायला पाहिजे. मी कोण तिचं लग्न करून देणारा? त्यांच्याच सगळं हातात आहे. फोटो आणून द्या; मग ह्यांनी फोटो आणून दिले. ते फोटोसुद्धा घेतले. पण त्या काळामध्ये काय झालं, माझी दुसरी मोठी आत्या होती, तिचा नवरा वारला. ते कळल्यानंतर लगेच आम्हांला जायला जमलं नाही. आम्ही चाळीसाव्याला गेलो. आमच्याकडे एक विधी करतात. चाळीसाव्वा म्हणतात त्याला. त्याला जायलाच पाहिजे होतं. आणि मी त्यांच्याजवळ फार राहिल्यामुळे आईने सांगितलं, आपण दोघी जाऊ. पण त्याची तयारी मी अशी केली की दलवाईंनी माझ्याबरोबर यायचं पुण्याला. आई दोन दिवसांत परत येईल आणि मी चार दिवस राहायचं. आणि त्या चार दिवसांत दलवाईंनी अमूक दिवशी यायचं आणि सगळ्यांना भेटून काय ते ठरवायचं.

 आईने कोंडून असं ठेवलं नाही. किंवा मारलं बिरलं नाही. कारण तिला माहिती होतं की मी इतकी भित्रट, की मी कुठे जाणारच नाही. तिला कल्पना नव्हती की मी अशी घर सोडून जाईन म्हणून.

मी भरून पावले आहे : २५