पान:मी भरून पावले आहे.pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्या डोक्यात खूप आहे. ते मला करायची मोकळीक मिळाली पाहिजे. त्याच्यात तू अडथळा आणायचा नाही." हे आमचं आधीच ठरलेलं होतं. तेव्हा समाजकार्य काय असतं हे मला माहिती नव्हतं. लिखाण काय असतं हेही मला माहिती नव्हतं. आपण कधी हे केलेलं नाही तर कसं कळणार आपल्याला? मी कॉलेजमध्ये असताना उर्दूमध्ये एक गोष्ट लिहिली होती. ती आता मला आठवत पण नाही काय लिहिली होती ती. ते एकच लिहिलेलं होतं. त्यामुळे लिहिताना माणसाला मूड लागतो, त्याला वेळ लागतो, त्याला प्रायव्हसी लागते, हे काही आपल्याला माहीत नाही. एकांत दिला म्हणजे माणूस लिहितो अशी माझी समजूत.
 आता उरला त्यांच्या भावंडांचा प्रश्न. मला वाटलं की मी त्यांची जबाबदारी घेईन. वेळ आल्यानंतर, आपण आपल्या मनाची तयारी ठेवली की आपल्याला करता येतंच सगळं. आत्तापासूनच त्याच्यावर वाद कशाला करायचा? मला लग्न करायचं होतं. माझा संसार मला हवा होता. माझी मुलं मला हवी होती. मला नवरा हवा होता. आईवडिलांमध्ये रहायचं आणि भावाची मुलं सांभाळायची त्याच्यापेक्षा आपला संसार बरा. वाटलं मला की हा मुलगा फसवणार नाही. हा मला बघेल. आता झोकून द्यावं स्वतःला. मग बघावं काय होतं ते आणि त्या हिशोबाने मग मी त्यांना होकार दिला लग्नाला.

 हो म्हटल्यावर मग गेले निघून, ठीक आहे म्हणून. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला त्यांच्यासाठी पास काढावा लागला. दुपारी लंचटाईममध्ये ते माझ्या ऑफिसमध्ये यायचे. तर येणं जाणं कसं करणार? रेल्वेचा पास काढून दिला. डबा मी आणायची तर त्याच्यात दोन चपात्या जास्त आणायची. रोज जेवायला त्यांना परवडायचं नाही म्हणून असं थोडं थोडं आम्ही जेवत होतो. रोज दुपारी यायचे आणि संध्याकाळी ते मला घेऊन जायचे. घेऊन जायचे म्हणजे चर्चगेटपासून आम्ही इकडे तिकडे फिरायचो. कुठे तरी खायचो आणि संध्याकाळी एका ट्रेनने घरापर्यंत जायचं. खालून मला सोडायचे माझ्या घरी आणि ते निघून आपल्या घरी जायचे. काय करायचं, कसं करायचं अशा रीतीने आमचं बोलणं व्हायचं. मी काही घरच्या माणसांदेखत हिंडत नव्हते. चर्चगेटला नाही तर दादरला जायचं. त्यांना संशय त्यामुळे नाही आला, पण नंतर उषाने दलवाईंच्या स्थळाबद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा आईला संशय आला. आता काय गाडी रोजची ठरलेली. एक गाडी जरी चुकली तरी वडील विचारायचे. तुला वेळ का झाला? त्यामुळे आणि मला खोटं बोलायची सवय नसल्यामुळे ते मला जड जात होतं. मी यांच्याशी खोटं बोलते.

मी भरून पावले आहे : २३