पान:मी भरून पावले आहे.pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"नाही,करा विचार तुम्ही. काय हरकत आहे?" असं म्हणाले. मी खाली उतरून आले आणि उषाने विचारलं. तिला सांगितलं, बाई असं असं आहे. ती म्हणाली, हिंदूंमध्ये सुद्धा तुला असा चांगला मुलगा मिळणार नाही. इतका फ्रँक आहे. तो गरीब असला तर काय झालं? त्याला नोकरी नसली तर काय झालं? आज नाही तर उद्या काय मिळणार नाही का नोकरी? तो पण शिकलेला आहे. एस्.एस्.सी. झालेला आहे. एफ्.वाय. झालेला आहे. मग त्याला पण नोकरी मिळेल की नाही? घर काय? सगळ्यांचेच काय बंगले असतात काय? आपण कशाला असा वाद करायचा? मुलगा कसा आहे? तुला सांभाळणारा आहे का नाही? आपण हाच विचार करायचा मेहरू आता. हे बघ मेहरू, माझं लग्न झालेलं आहे. नाही तर मीच याच्याशी लग्न केलं असतं, इतका मला आवडलाय. तू माझी मैत्रीण आहेस. हरकत नाही तुझ्याशी हे बोलायला. तू नाही म्हणू नको. म्हटलं, “आईला कोण समजवणार?" "त्याची जबाबदारी घेईन ना मी. तू त्याची काळजी करू नको." आणि गंमत अशी की बोलता बोलता मी दलवाईंना विचारलं, तुम्ही पण काय खादी कमिशनमध्ये ट्राय करता की काय? तर ते म्हणाले, “माझा इथे इंटरव्ह्यू झालेला आहे. ते सातारवाला आहेत त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलाय. आणि याच्यावर चेष्टापण झाली की तुमच्यासारखीला घेतात इथं, मग मला का नाही घेणार? आणि मग अशा रीतीनं दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरलं आमचं.
 हसनशेट म्हणून चुलत भाऊ होते दलवाईंचे. त्यांच्याकडे जोगेश्वरीला दलवाई राहायचे. आणि घरात जेवायचे-बिवायचे नाहीत. नोकरी नव्हती. पैसे देता येत नाही म्हणून जेवायचे नाहीत. या दिवसांमध्ये चणे खाऊनसुद्धा त्यांनी दिवस काढलेले आहेत. घरात एवढ्या जबाबदाऱ्या, त्यांना पैसे आपण पाठवू शकत नाही. बाबांची हालत खराब आहे. त्यामुळे तो फार अपसेट झालेला माणूस होता. त्यामुळे लिखाणही जेमतेम. चार महिने इथं नोकरी झाली, दोन महिने तिथे. कायम नोकरी लागली नव्हती.

 तेव्हा समाजकार्य सुरू केलेलं नव्हतं. पण लोकांशी ओळख खूप होती. लिहीत होते म्हणून ओळख होती. आणि समाजकार्य करण्याचं मनात होतं. तेव्हाच मला म्हणाले, “मला आज काही नोकरी नाहीए. पण उद्या मला नोकरी लागेल. पण एक काम करायचं. आज घर जे आहे, संसार जो आहे तो तुझा. तो कसा चालवायचा ते तू ठरवायचं. मी त्याच्यात दखलसुद्धा देणार नाही. तुला विचारणार सुद्धा नाही. मला समाजकार्य करायचंय. मला लिहायचंय.

२२ : मी भरून पावले आहे