Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 २ नोव्हेंबर १९८५ ला हा मोर्चा निघणार होता कोल्हापूरहून. दोन-चार दिवस राहिले तरी एस.टी.चं काम झालेलं नव्हतं. का तर हाती कॅश पैसे नव्हते. हे चेक मिळाले ते कॅश कसे करायचे. नि कॅश करेपर्यंत कोण थांबणार आहे? त्यामुळे माझं डोकं चालेना. पहिल्यांदाच मी प्रोग्रॅम घेतला. पहिल्यांदाच मी पैसे उभे करायला म्हणून बाहेर पडले होते. त्यामुळे मला मानसिक त्रास खूप झाला. मी काय केलं? माझ्या प्रॉव्हिडंट फंडामधून २५,०००/- रुपये काढले. ते हँडी ठेवले घरात. का तर, जर हे चेक वटले नाहीत तर आपण हे भरायचे. चेक वटल्यावर परत काढून घ्यायचे. तो एक व्याप झाला. सगळ्यांनी मला मूर्खात काढलं ऑफिसमध्ये. माझ्या मैत्रिणी विमलबेन, सुशीलाबेन आणि मीना मला म्हणाल्या, 'अशा रीतीनं काम करणार असशील तर करूच नको. कशासाठी करायचं? काय गरज आहे तुला हे सगळं करायची? अन् तुझ्या फ्यूचरचं काय होणारेय? तू भीक मागणारेस. तू असली कामं करू नकोस', म्हणून मला सगळ्यांनी विरोध केला. पण मी काही ऐकलं नाही.

 त्याच्यानंतर थोपटेसाहेबांकडे चार दिवस मी जात होते. अपॉइंटमेंट घेण्यासाठी. आत जायची वेळ यायची नि ऐन टायमाला ते बाहेर निघायचे की माझी मीटिंग आहे मी चाललो. तीन दिवस असं बघितलं. दिवसभर बसून ही तऱ्हा! आणि नंतर मला असं वाटलं की काय करावं आता? दोन-चारच दिवस राहिलेले आहेत. यांनी काम नाही केलं तर प्रोग्रॅम कँसल करावा लागेल. चौथ्या दिवशी माझं डोकं जरा फिरल्यासारखं झालं. मी तिथं गेले. आत चिट्ठी पाठवली. दोन तास गेल्यानंतर ते आले नेहमीसारखे. बाहेर आल्यानंतर मी दरवाजात जाऊन आडवा हात केला नि उभी राहिले. त्यांच्यामागे ५० माणसं होती उभी, बाहेर आत अशी. मी म्हटलं, 'साहेब, मी आज तुम्हाला अशी जाऊ देणार नाही. अॅप्लिकेशन लिहिलं, माझा चार दिवसांवर प्रोग्रॅम आला तरी तुम्ही मला एस.टी. दिलेली नाहीये की तुम्ही मला एकदा सुद्धा भेटला नाहीये. मी तुम्हांला जाऊ देणार नाही.' मीटिंग आहे म्हणाले. 'मी ऐकणार नाही. तुम्हांला मीटिंगला सुद्धा जाऊ देणार नाही. माझं ऐकून घ्या. माझा निर्णय लावा. माझं काय ते ठरवा नि मग मीटिंगला जा', मी म्हटलं. जेव्हा त्यांना कळलं की सगळे बघायला लागले आहेत तेव्हा ते म्हणाले, 'बरं आत चला.' आत गेल्यानंतर त्यांनी माझं सगळं ऐकलं. म्हटलं, साहेब, असं असं आहे. चार दिवस राहिलेत. तेव्हा ते म्हणाले, मोर्चा बिर्चाला आम्ही, गव्हर्नमेंट नाही मदत करत. म्हटलं, मग तुम्ही निमित्त काहीही सांगा. तुम्हांला मी खरं

मी भरून पावले आहे : १७९