पोटगी द्यायला काही हरकत नाहीये. मुसलमान चिडले याचं कारण, हे कोण आहेत आमच्यामध्ये ढवळाढवळ करणारे? ह्यांना कुणी ऑथॉरिटी दिली कुराण बघण्याची? हे मुल्लामौलवी, मुस्लिम धर्मपंडितांचं काम आहे, असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी विरोध केला आणि दुसरं, हा अभ्यास करताना समान नागरी कायद्याचा पुरस्कार केला गेला. दोन्ही गोष्टी त्यांना नको होत्या. म्हणून त्यांनी असं म्हटलं की ही जी पोटगी आहे ती आमच्या शरीयतच्या विरुद्ध आहे. पोटगी काही देता येणार नाही. आणि मग काही मुसलमानांनी शहाबानूला आपल्या कंट्रोलमध्ये घेऊन मिसगाईड केलं. ती बिचारी घाबरली हो. तिला काय माहितीये, सगळं काय आहे? मुलं पण घाबरली. त्यामुळे सगळी केस उलटली. लोकांना जागृत करायला हवं होतं म्हणून आम्ही म्हटलं की आपण ही केस लोकांना सांगावी आणि दुसरं पण असं की, मुस्लिम सत्यशोधक मंडळाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहे. सगळ्यांना असं वाटतं की हे धर्माच्या विरुद्धच बोलतात. पण कोणी दलवाईंना ऐकलं नाही. कोणी हा विचार केला नाही की बाबा, मुस्लिम सत्यशोधक मंडळ खरं काय काम करतं? धर्माच्या कुठल्या बाबींच्या विरुद्ध बोलतं? तर हे सगळं सांगण्यासाठी तो तलाक मुक्तिमोर्चा काढण्यात आला.
त्या अगोदर काही गोष्टी आम्हांला कराव्या लागल्या. एक तर पैशाचा प्रश्न होता. पैसे कुठून आणायचे, मोर्चा काढायला? मोर्चात किती माणसं जायची ते ठरलेलं होतं. कुठं कुठं जायचं ते ठरलेलं होतं. कसं जायचं? एस.टी. करायची तर त्याच्यासाठी आधी पैसे किती लागणार आहेत? ट्रान्स्पोर्ट ऑफिसचे मिनिस्टर अनंतराव थोपटे होते. त्यांची माझी काही ओळख नव्हती. कोणाच्या तरी थ्रू मी तिथं जाण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही अॅप्लिकेशन केलं. नंतर कळलं की एस.टी. जर तुम्हांला हवी असेल तर २०,०००/- रुपये आधी भरावे लागतील. बरं आमची तत्त्वं अशी होती की वाटेल त्याच्याकडून काही पैसे घ्यायचे नाहीत. असं म्हटलं तर अडचण येते. लिमिटेड लोकांकडून किती पैसे घेणार? कोण देणार? मुसलमानांच्या रिवाजाविरुद्ध आमचा विचार आहे. मुसलमान देणार नाहीत आणि हिंदू हितचिंतक जे आहेत तेच मदत करणार. त्यांच्याकडे पैसे असले तर. त्यामुळे ही सगळी आमच्याकडे अडचण अशी होती. तर आम्ही सॉवेनिअर काढायचं ठरवलं. मी नि महंमददा खूप फिरलो. जाहिराती आम्हांला मिळाल्या. दोन महिन्यांत ५० खेपा मारल्या एकेकाकडे. तेव्हा त्या जाहिराती मिळाल्या. चेकही मिळाले. पण चेक खूप लेट मिळाले.