पान:मी भरून पावले आहे.pdf/195

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 निमित्त सांगितलं. खरं लिहून दिलं. मला खोटं सांगायचं नाहीये. तुम्ही कशासाठी पैसा देता? कशासाठी तुम्ही गाडी देता? त्याला तुम्ही द्या. मला मदत पाहिजे. मला हे काम महत्त्वाचं आहे. आत्ताच करायला पाहिजे. असं त्यांना बजावल्यावर ते हसले माझ्याकडे बघून. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं जरा. मग त्यांनी त्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना बोलावलं, त्यांना सांगितलं की या बाईंना मदत करा. अधिकारी म्हणाले की, बाई, मोडकी-तोडकी अशी तशी बस देऊन चालणार नाही तुम्हांला. रस्त्यात बंद पडली, पंक्चर झाली, तुम्हांला कोणी मारहाण केली तर आमची नोकरी जाईल इकडे. आम्ही तुम्हांला प्रोटेक्शन तरी कसं देणार? तुम्हांला कोरीकरकरीत बस द्यायला पाहिजे. म्हटलं तुम्ही काहीही करा मला एस.टी. दोन तारखेला सकाळी पाहिजे. मोर्चा म्हणजे शांत मोर्चा आहे. असे असे प्रोग्रॅम ठरवलेले आहेत. कलेक्टरला निवेदन द्यायचं, काही लोकांना भेटायचं तिकडे आणि रात्री एक पब्लिक मीटिंग घ्यायची नि मीटिंग सुद्धा अशा अशा कारणासाठी घ्यायचीय. आम्हांला काहीही दंगा-धोपा करायचा नाहीये नि आमच्यातर्फे असं काही होणार पण नाही. कोणी करणार नाही, तर तुम्ही आम्हांला एस.टी. द्याच. तर ते म्हणाले, २०,०००/- रुपये तुम्हांला कॅश भरावे लागणार आहेत. नंतर तुमचा हिशोब होईल. पण आधी तुम्हांला पूर्ण पैसे भरावे लागतील. मी म्हटलं पण पैसेही नाहीयेत. ते म्हणाले, आता ते काही मी करू शकणार नाही. तेवढं तुम्ही करा. मी जे पैसे काढलेले होते, ते घेऊन २ तारखेला सकाळीच कोल्हापूरला पोचले. हुसेन जमादारला घेतलं नि पैसे भरले आधी. पैसे भरल्यानंतर आमची एस.टी.ची सोय झाली. लगेच दुपारी आमचा प्रोग्रॅम सुरू होणार होता. त्यांनी विचारलं की, ड्रायव्हर कुठला? म्हटलं, आमचा. आमची माणसं, ड्रायव्हर पण आमचाच असेल. तर सय्यदभाई कोल्हापूरचे आहेत. ते एस.टी. वर ड्रायव्हरच होते. ते आमचे कार्यकर्तेच होते. ते म्हणाले, मी करतो काम. नि असा आम्हाला डायव्हरसुद्धा खूप चांगला मिळाला. ते पहिल्यापासूनच आमच्या बरोबर होत. त्यामुळे खुषीने ते आले.

 आमच्या प्रवासामध्ये ८० वर्षांच्या बाबूमियाँ बँडवालेंपासून ९ महिन्यांच्या लहान मुलापर्यंत असे ४२ जण होते. आणि हा प्रवास आम्ही केला. परभणी नांदेडपासून गडबड सुरू झाली. जळगावला आम्ही आल्यानंतर एक गोष्ट घडली तिकडे. सकाळचा मोर्चा वगैरे काढून आम्ही निवेदन दिलं. रात्रीची सभा जिथं झाली तिथं स्टेजवर आम्ही बसलो. एकेक जण बोलायला लागला. दोघातिघांचं

१८० : मी भरून पावले आहे