पान:मी भरून पावले आहे.pdf/192

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घालायला लावा आणि मग कंपॅरिझन करा. कोण बरोबर आहे, कोण नाही. असं कोणालाही बोलावून तुम्ही त्रास देऊ नका. अशा रीतीने मी घरी आले. त्यानंतर मला कशाही रीतीने त्रास झाला नाही. त्या बाईने पुन्हा त्रास दिला नाही. तसा प्रश्न आला नाही. कारण तिला मी जास्त जवळ केलं नाही.
 मी जेव्हा मंडळाचं काम करायला लागले तेव्हा प्रभाकर पाध्ये यांनी मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, तलाकपीडित महिलांचा प्रश्न हा स्त्रीमुक्ती चळवळीतील एक नस आहे. आणि हे खरं आहे. ही नस धरून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. पाध्येंनी आणि कमलताईंनी माझ्या रुबीनाला आपल्याकडे कॉलेजच्या शिक्षणासाठी ठेवावं असा आग्रह धरला. पण ती तयार झाली नाही.
 आता मुक्तिमोर्चाचं. मुक्तिमोर्चाची कल्पना हुसेन जमादारची. शहाबानू केस झाली. त्या केसमध्ये आम्ही तिला पुण्याला बोलावून तिचा सत्कार वगैरे केला. आणि नंतर मी कोल्हापूरला गेले असताना हुसेन म्हणाला, आपण मोर्चा काढू एक. त्या वेळी मुक्तिमोर्चा हे नाव ठेवलेलं नव्हतं. त्याच्यासाठी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली. डिक्लेअर केलं की आम्ही मोर्चा असा कोल्हापूरहून अशा अशा गावांमध्ये नेणार आहोत. आणि मग त्याच्या तयारीला लागलो.

 तर या मोर्चाचा खरा हेतू काय होता? शहाबानू केस कोणाला माहिती नाही? शहाबानू ६५ वर्षांची बाई. तिला नवऱ्याने सोडली. मुलांनी केस घातली की, आपल्या आईला पोटगी मिळावी. आणि तो सुप्रीम कोर्टपर्यंत गेला. नवरा वकील. असल्या केसेस जिंकून महिन्याला ५-७ हजार रुपये कमावणारा. आपल्यावर पाळी आल्यावर तो हादरला आणि केस लढल्यानंतर ती बाई जिंकली. ऐतिहासिक निर्णय लागल्याबद्दल आम्ही खूष झालो आणि तिचा सत्कार केला. हे सगळं झाल्यानंतर धर्मवादी मुसलमानांच्या मनात आलं की हे शरीयतच्या विरुद्ध आहे. तसं म्हटलं तर हे खरं कारण नाहीये त्याला. मला जे कळतंय ते कारण असं की कोर्टाचे जे जजेस होते ते एक तर मुस्लिम नव्हते. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जेव्हा १२५ कलमाची छानबीन केली, बघितलं की त्या कलमामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या आणि कुराणातल्या आयता म्हणजे श्लोक जे असतात त्यांच्यात काही तफावत नाहीये. बाईला पोटगी देऊ नये असं कुठेही लिहिलेलं नाही. चार बायकांना बरोबरीचा दर्जा द्या, याचा अर्थ काय होतो? त्यामुळे हा खुलासा केलेला नव्हता. बायकोला सोडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे असं कुठेही लिहिलेलं नाहीये. म्हणून

मी भरून पावले आहे : १७७