पान:मी भरून पावले आहे.pdf/191

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणाला, 'हे कोण सगळे बसलेले आहेत? त्यांचं काय काम आहे?' म्हटलं, 'माझं काम आहे तेच त्यांचं काम आहे.' तर 'नाही' म्हणाले. 'तुमचं मला स्टेटमेंट लिहायचं आहे.' मी म्हणाले, 'मी स्टेटमेंट देणार नाही. ही माझ्या मंडळाची माणसं आहेत. मी मंडळासाठी काम करते. माझं पर्सनल काहीच नाही. त्यामुळे मी एकटी देणारच नाही. मी लोकांच्या समोरच स्टेटमेंट देणार. आणि आधी देणारच नाही.' 'नाही, नाही, चालणारच नाही. या लोकांना आधी बाहेर काढा', असं ते म्हणाले. हे बघा, म्हटलं, 'मी अपराधी नाही. मी कुठला अपराध केलेलाच नाही. मी अपराध केलाय म्हणून तुम्ही धरून आणलंय का मला? नाही ना? मग ही भाषा बोलायची नाही. यांच्या समोर स्टेटमेंट घ्यायचं असेल तरच घ्यायचं, नाही तर चला म्हटलं, उठा, आपल्याला काय गरज आहे? गरज असेल यांना, तर धक्के खातील सतरा.' जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी ऐकत नाही. तेव्हा म्हणाले, 'बाई, मला माफ करा. क्षमा करा. माझी नोकरी जाईल. मला म्हणतील एका बाईचं स्टेटमेंट घेऊ शकला नाही.' महंमददा म्हणाले, 'ही बाई काय आहे तुम्हाला माहिती नाही, म्हणून तुम्ही बोलता. हरकत नाही, घ्या स्टेटमेंट.' आणि मग मी काय लिहिलेलं होतं, कोणते मुद्दे बोलले ते सांगितलं. बोलता बोलता हा मुद्दा आला बालविवाहाचा. गंमत काय झाली माहिती आहे? का मी उर्दूमध्ये मराठी लिहिलेलं होतं. त्यांना उर्दू येत नाही आणि मराठीपण जेमतेम होतं त्यांचं. तर मी म्हटल, 'आता काय कराल मग? मला या दोन्ही भाषा येतात. बरं, म्हटलं तुम्हांला इंग्लिश समजतं का? हे पुस्तक घ्या. यातलं अमुक पान काढा नि पेज वाचा. वाचल्यानंतर म्हणाले, बराच अभ्यास केलेला दिसतो. होय म्हटलं. तुमच्यासारख्या माणसाला तोंड द्यायचं असेल तर असा अभ्यास पाहिजेच. तर म्हटलं, जर हे विधान चुकीचं असलं तर हे पुस्तक बॅन करा. मी त्यातलं उदाहरण देणार नाही. ज्या अर्थी, बॅन झालं नाही त्या अर्थी त्यातलं उदाहरण द्यायला हरकत नाही. लोकांची समजूत आहे का, मुसलमानांनी लिहिलेलं तेच बरोबर. इतरांनी लिहिलेलं ते बरोबर नाही. अशा भानगडी असतात. ते पुस्तक माझ्याकडे होतं. मी ते वाचलेलं होतं म्हणून मी ते दिलं. सगळ्यांना माहिती होतं की ही खरी गोष्ट आहे. माझ्या मनात बेअदबी करायची होती म्हणून काही मी ती गोष्ट सांगितली नाही. तर म्हटलं बॅन करा हे पुस्तक. वापरणार नाही मी हे पुस्तक. तर मग त्यांनी सगळे स्टेटमेंट लिहून घेतले. मी म्हटलं, कोणी तुम्हांला कंप्लेंट केलेली आहे. कोणाच्या बोलण्यावर तुम्ही मला त्रास दिला हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यांना सुद्धा, म्हटलं, चार खेपा

१७६ : मी भरून पावले आहे