Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १९८३ मध्ये माईसाहेब पारखे एक आदर्श माता, हा पुरस्कार मला मिळाला. राजश्री शाहू छत्रपती स्मारक हा पुरस्कार मला जुलै १९८५ साली मिळाला. रुपये पाच हजार आणि प्रमाणपत्र असा हा पुरस्कार होता. मुसलमानांमध्ये सोशल रिफॉर्मेच्या या कामासाठी.
 रुबीनावर अण्णांचं खूप लक्ष होतं. तिची जुळी मुलं सहा वर्षांची झाली. ती नोकरी करत नव्हती. मी एकदा अण्णांना भेटायला गेले असताना त्यांनी मला सांगितलं. आता रुबीनाची मुलं पूर्ण दिवस शाळेत जातात. तिने आपला सर्व वेळ घरात काढू नये. तिथे नोकरी करावी असं मला वाटतं. अण्णांची तब्येत त्या वेळी फारशी बरी नसायची. मला म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, ती जबाबदारी माझी आहे. अण्णा जायच्या अगोदर त्यांनी रुबीनाला 'अपना सहकारी बँकेत' नोकरीला लावले.
 सी.डी.चपटवाला हे खादी कमिशनमध्ये माझे ऑफिसर होते. त्यांनी दलवाईंना आवडत नसतानासुद्धा त्यांचा पाच हजार रुपयांचा विमा काढला. त्यांच्या मनात तर दलवाईंचा अपघात विमा काढायचं होतं. त्यांना असं वाटायचं की हा माणूस असं काम करतो आणि त्याच्या जिवाला केव्हाही धोका होऊ शकतो. पण त्यासाठी दलवाई तयार झाले नाहीत. दलवाई गेल्यानंतर जसलोक हॉस्पिटलचे अकरा हजार एक महिन्याच्या मुदतीत भरायचे होते. त्या वेळी शहासाहेब म्हणाले, 'आपण आता लोकांच्याकडे पैसे मागणं बरोबर नाही.' त्या वेळी हे विम्याचे पाच हजार रुपये कामाला आले. शिवाय शहासाहेबांच्या सांगण्यावरून मंडळाची गाडी विकून बाकीचे पैसे उभे केले.

मी भरून पावले आहे : १६१