पान:मी भरून पावले आहे.pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे प्रश्न काय आहेत, माहिती नाहीयेत. पण मला तुम्ही गाईड करा नीट सगळ्यांनी. बायकांशी संबंधित अशाच विषयाशी काम करू शकेन असं वाटतं. मी बायकांमध्ये घरापर्यंत पोचू शकेन. एवढं काम मी करू शकेन. घरातली आतली माहिती मी तुम्हांला आणून देऊ शकते- एखाद्या घरात काय चाललेलं आहे. आणि या बाईला काय त्रास आहे. बायकांमध्ये मी काम करू शकेन असं मला वाटतं, तर मी करू का? जमेल का मला?' त्यावर महंमददा म्हणाले, 'काकी जर काम करणार असल्या तर मी त्यांना आपल्या लीडर समजून सगळी मदत करीन.' खूष झाले शहासाहेब. एक माणूस भेटला आपल्याला काम करायला म्हणून ते खूष झाले. म्हणाले, काही हरकत नाही.' मग त्यांनी एक मीटिंग घेतली. 'साधना'मध्ये. मी असतानाच. यदुनाथजी तिथं होते. आणि सगळ्यांना सांगितलं, 'आता या मिसेस दलवाई आपल्याबरोबर काम करणार आहेत.' मग यदुनाथजींनी मला विचारलं, 'भाभी, आता परत कधी येणार तुम्ही पुण्याला?' तर मी म्हटलं, 'बघू या.' म्हणाले, 'तुम्ही काम करणार नं. तुमच्या कामाचा एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही वारंवार यायचं, वारंवार लोकांना भेटायचं, संपर्क साधायचा, बोलायचं, हा कामातला तुमच्या एक भाग आहे. इथपासून तुम्ही काम सुरू करायचं.' पुण्यात एक मोठी कंडोलन्स मीटिंग झाली. सय्यदभाई वगैरे बोलले होते. मला घेऊन गेले होते. मला बोलायला सांगितलं. पण मला काहीच बोलायचं नव्हतं. मला काय येत होतं बोलायला? मी कशाला स्टेजवर जाऊन बोलू? मुलींना घेऊन तिथं फक्त गेले.

 दलवाई गेल्यानंतर प्रभुभाईंच्या घरी अण्णा (एस.एम.जोशी) यांनी मला बोलावलं. आणि विचारलं, भाबी, तुमच्यावर पुष्कळ जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी आम्ही काय करायचं? मोकळेपणाने सांगा. माझे डोळे भरून आले. माझ्या घरातील लोकांपैकी कुणालाही हा प्रश्न विचारावासा वाटला नाही. तो अण्णांनी मला विचारला. मी स्वतःला सावरलं. आणि त्यांना सांगितलं, अण्णा, मी नोकरी करते. माझ्या जबाबदाऱ्या मी उचलू शकेन. त्यासाठी कुणाकडून काहीही मदत घ्यायला मला आवडणार नाही. तुम्ही मला विचारलं, फार बरं वाटलं. माझं कोणी तरी आहे. त्याचं समाधान वाटलं. तुम्ही माझ्यासाठी एकच गोष्ट करावी असं मला वाटतं. ती अशी की मी दलवाईंचं काम करणार आहे. त्यासाठी तुमचा सल्ला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही द्या. खरं म्हणजे मी दलवाईंच्या सगळ्या मित्रांना धरून ठेवल्यामुळे त्यांची सहानुभूती मला मिळत गेली.

१६० : मी भरून पावले आहे