Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एकोणीस दिवस पुण्याला राहून काम करण्याचा निश्चय करून मी मुंबईला परत आले. शहासाहेबांनी मला घरी आणूस सोडलं. पवारांच्या घरी. दोन-चार महिने राहिले मी. मला जाऊ देत नव्हत्या पवारवहिनी. 'नाही, नाही तुम्ही लवकर जाऊ नका. तुमचं मन रमेपर्यंत इथं रहा. तुम्हांला काही काळजी करायला नको. तुम्हांला सगळं प्रोटेक्शन इथं मिळेल.' असं त्या म्हणायच्या. अशा रीतीनं त्यांनी माझं खूप केलं. आणि नंतर नंतर सुद्धा जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा प्रोटेक्शन होतंच. दलवाईंना सुद्धा होतं. पण गंमत अशी की घरात कोचावर हे बसलेले असले का तो गार्ड असा उभा, नाही तर गॅलरीत दारामध्ये तो उभा. किंवा खाली दोन माणसं उभी आहेत वर दोन माणसं उभी आहेत. जड जायला लागलं हो. प्रोटेक्शनखाली बोलायची चोरी घरात. गंमत काय व्हायची – रात्री आम्ही झोपलेले असायचे नं तेव्हा खाली बसलेले असायचे गार्ड. कोणी आलं का मी उठायची नि धाडकन् दार उघडायची आणि बोलायची. तेव्हा पोलीस येऊन मला म्हणायचे, 'अहो बाई, आम्हांला इथे का बसवलेलं आहे? दार उघडून तुम्ही बोलू नका.' मी म्हणायची, 'अहो, पण ही आमचीच माणसं आहेत. असं करू नका. तुम्हांला कळत नसलं तरी मला भीती वाटत नाही. ही माणसं काय खून करणारैत?' मग यांनी सांगितलं की मला प्रोटेक्शन नको. मला या लोकांत जर काम करायचं असेल तर माझ्या मागं-पुढं पोलीस बघितल्यानंतर माझ्याकडे कोण येणार? यांनी मला मारलं तरी चालेल पण मला असं प्रोटेक्शन नको आहे. फोन येणं, निनावी पत्र येणं, कामाच्या बाबतीत धाकदपटशा हे सुरुवातीपासून होत असे. मी पण जेव्हा मीटिंगला जात होते, तिथं मी काही बोलले का मला लगेच फोन यायचे. दमबाजीचे. आणि मग मी त्यांना फोनवर सांगायची का असं फोनवर डिस्कस करू नका. मी तिथं काय बोलले हे तुम्हांला डिस्कस करायचं असेल तर माझं दार उघडं आहे. तुम्ही इथं या आणि माझ्याशी बोला. 'नहीं, नहीं, आपके गुंडे होंगे ना नीचे बैठे हुए.' तर मी म्हणाले,

१६२ : मी भरून पावले आहे