पान:मी भरून पावले आहे.pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यावं. तिथं भाषणंबिषणं नकोत. काहीही माझं केलेलं मला आवडणार नाही. मग रीसर्च सेंटर वगैरे उघडा. असं सगळं त्यांनी ते लिहून ठेवलेलं वाचलं. वाचल्याबरोबर गोंधळ सुरू झाला. लोक म्हणाले हे विल नाही. हे आम्हांला मंजूर नाही. यांनी आमच्या भावना दुखावतात. आणि शेवटी पवारसाहेब, शहासाहेब असं म्हणाले की, 'तो आमचा मित्र होता. त्याच्या इच्छेविरुद्ध जर गेलं तर आमची भावना दुखावेल आणि या वेळी आम्ही आमच्या भावना दुखावून घेणार नाही.' हे बोलायच्या अगोदर शहासाहेब माझ्याकडे आत आले आणि मला म्हणाले, 'काय करायचं? तुम्ही सांगा. तसं आम्ही करू. यांच्या स्वाधीन करायचं का?' मी म्हटलं, 'नाही शहासाहेब, हे विल मी लिहिलेलं आहे. दलवाईंच्या मनात जे असेल ते करायला मी तयार आहे. तुम्ही माझ्या पाठीशी रहा. एवढीच माझी तुम्हांला विनंती आहे.' त्या वेळेस दंगल वगैरे होईल अशी भीती वाटली. चंदनवाडीत न्यायचं म्हटल्यावर भराभर सगळे गाववाले निघून गेले. बायकांसकट. ह्यांची मावशी आना होती, आई होती, मामा होते. का गेले? गावात राहायचंय, वाळीत टाकतील, म्हणून हे लोक नाईलाजानं गेले. त्यांना कळलंच नाही काय करायचं ते. जावंसं वाटत नसतानासुद्धा ओढूून ओढून नेल्यासारखे गेले. काही मुलं जी स्टंट करणारी होती ती इथं राहिली. का हमीदकाकाच्या मयतीला आम्ही आहोत. अशी पण होती त्याच्यात मुलं ज्यांच्यावर यांचे संस्कार होते. ती थांबली असावीत. मला काही माहिती नाही. मी आतल्या खोलीत बसलेली होते.

 त्याच्यानंतर मला नेऊन बाहेर मुलांसकट बसवलं. तिथं डॉ. कुरुव्हिला आणि डॉ. कामत आले. मयतीला ते पण आले होते. त्यांनी मला सांगितलं की बाई, पोस्टमॉर्टेमचे रिपोर्ट एकदम ठीक आहेत. काही चूक झालेली नाही. आपल्या पेशंटमध्ये काही दमच नव्हता. ते इतके चांगले डॉक्टर होते. त्यांनी इतकं चांगल मन लावून सांभाळलं. इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं की कुठल्या हॉस्पिटलमध्ये राहिल्यासारखं वाटलंच नाही मला. नंतर मित्रमंडळी होतीच. घर भरलेलं होतं. काही करायचंच नव्हतं. ते फोटोबिटो काढणं झालं. पत्रकार आले. काय काय त्यांचं झालं आणि त्याच्यानंतर इंदूताई पारीख, सौ. तळवलकर आल्या आणि मला म्हणाल्या 'भाभी, कशाला तुम्ही चंदनवाडीमध्ये येता? तुम्ही येऊ नका, तुम्हाला ते सगळं काही बघवायचं नाही, आम्ही जातो.' म्हटलं, 'नाही. इथपर्यंत सोबत केली आहे नं, शेवटपर्यंत येऊ दे मला. मला तरी चंदनवाडी कुठे माहितीये? मला शेवट बघू दे त्यांचा. तुम्ही मला अडवू नका. मी बघू शकेन. तुम्ही काळजी करू

मी भरून पावले आहे : १५५