पान:मी भरून पावले आहे.pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नका.' आणि गाड्या केल्या भराभर आणि त्या गाड्यांमधून आम्हांला नेण्यात आलं.
 चंदनवाडीमध्ये गेलो. त्या हॉलमध्ये सगळे थांबले. सगळे तिथे जमा झाले. काही लोक डायरेक्ट चंदनवाडीतच आले होते. मला भेटले नव्हते. माझे ऑफिसर वगैरे, दस्तूर, पालेकर, माझी मैत्रीण तुंगारे, ते सगळे आले होते. मला भेटलेबिटले. आणि तिथं बघितलं. त्या विद्युतदाहिनीमध्ये कसं माणसाला घालतात. इलेक्ट्रिकचे शॉक देऊन कसा तो देह खाली गेला हे सगळं मी बघितलं. त्यांनी दार बंद केलं आणि मग मला आवरेना. मुलींना जवळ घेतलं. असं वाटलं का हा मनुष्य खरोखर आता आपल्याला सोडून गेला. गंमत अशी की ह्या माणसाला 'आपलं वय झालेलं नाही, आपल्याला जबरदस्तीने मरण येतंय आणि कोणीतरी ओढून नेतंय' असं सारखं वाटायचं. हे मी इतक्या जवळून बघितलेलं आहे की मला वाटले असं कसं होऊ शकतं? तुम्ही म्हणता ना, देव आहे. सगळं आहे. कुठं गेला होता तो? आम्ही मानतो का नाही मानतो तो प्रश्न नव्हता. पण हे सगळं इतकं लवकर व्हायला नको होतं. असा काय यांनी गुन्हा केला होता ज्याची एवढी मोठी शिक्षा त्यांना मिळावी? ज्याला वाटतंय मी काम करावं, माझं वय अजून झालेलं नाहीये, मी पण लोकांच्यासारखं जगावं, पण मला मरताही येत नाही. जगताही येत नाही. इतकं मरण जवळ. अशा पद्धतीचं मरण, फार क्लेश क्लेश. अशा पद्धतीचं ते मरण नको होतं.

 घरी सगळे येणारे जाणारे. तळवलकरांची बायकोही सतत असायची. जशोदताई - म्हणजे मिसेस शहा. नगरकर, कुमुदवहिनी - नगरकरांची बायको - हे सगळे असायचेच येऊन जाऊन माझ्याकडे. माझी समजूत घालायला. महंमद दलवाई हे किती जवळचे होते. पावलापावलाला मदत केलेली आहे मला त्यांनी. माझी साथ सोडली नाही. एक विल त्यांच्या शेवटच्या क्रियेचं होतं. दुसरं विल असं होतं की, महंमद खडस नि हे महंमददा दोघांनीही जे गाववाले करतील त्याला सामोरं जावं. म्हणजे माझी सुरक्षा त्यांनी करावी. त्यांनी काही केलं तरी मला त्रास होऊ नये याची काळजी त्या दोघांनी घ्यावी असंही होतं. आणि तिसरी विलची जी कॉपी होती ती शहासाहेबांच्या नावावर होती. की, मला चंदनवाडीमध्ये नेल्याबरोबर शहासाहेबांनी माझ्या फॅमिलीला आपल्या घरी न्यावं. संरक्षण म्हणून.' हे महत्त्वाचं होतं. दलवाईंना माहिती होतं की आम्हांला तिथं ठेवल्यानंतर समाज आम्हांला राहू देणार नाही, त्रास देणार. समाजापेक्षा आमचे गाववाले,

१५६ : मी भरून पावले आहे