Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करायचेत. आणि ती लिस्ट काढली. पहिला फोन मी घरी केला. पवारांच्या घरी. तर मला कळलं का रात्रीच दोघं कारने बारामतीला गेले. ताबडतोब तिथे ट्रंककॉल केला आणि मला कळलं की ते तिथून निघालेले आहेत. दुपारी १२-१ पर्यंत ते इथं येतील. 'तुम्ही काही काळजी करायची नाही. ते येऊन सगळं करणार आहेत, असा निरोप होता. माझी आई घरी होती. मग हवालदाराला सांगितलं का माझ्या आईला हे सांग, तिला घेऊन ये. मग हवालदार गाडीमध्ये आईला घालून घेऊन आले. आमची आई आल्यावर भोकाड पसरायला लागली. लगेच तिला सांगितलं, की हे हॉस्पिटल आहे. इथं सभ्यतेनं वागायचं, हे घर नाहीये. आणि अशा रीतीनं कुणी मेला म्हणून गोंधळ करायची काही गरज नाही. का, तर तिचं पण पुराण बरंच आहे. वर्षभर राहिली ती. पण तिने यांना जावई म्हणून अॅक्सेप्ट केलेलंच नव्हतं. कधी असं झालं नाही की ती दवाखान्यात आली, तिने मला असं सांगितलं की तू जा घरी. मी जरा २-३ तास बघते. आराम कर. काय लागलं हमीदला तर मी देईन. असं झालेलं नाही. एवढंच नाही तर घरी जेव्हा चार दिवस येऊन राहात होतो तेव्हा मी बाहेर कुठं तरी गेले तर एक कप चहा करून दिला असं झालेलं नाही. आमची धुणं-भांड्याची बाई यायची ना, ती चहा करून द्यायची, पण आईनं काही दिला नाही.

 आईची एक आठवण सांगते, आई आमच्या घरी होती. तेव्हा पवारवहिनींनी एकदा विचारलं का माँजी, तुमच्याकडे काय रिवाज आहे? समजा, एखाद्या मुलीचं लग्न ठरलं तर काय काय करावं लागतं? ती म्हणाली, आमच्या एका मुलीच्या लग्नाला २५,०००/- रुपये खर्च येतो. समजलं? सगळं द्यावं लागतं. तिनं मला डोळा मारला. वहिनी मला म्हणाल्या, 'काकी, तुम्ही आता पन्नास हजार रुपये तयार ठेवा. नाही तर तुमच्या मुलींची लग्न होणार नाहीत.' तर मी म्हटलं, 'जाऊ दे हो. हे पन्नास हजार कुठून आणायचे? हा पेशंट आहे. त्याला औषधाला माझ्याजवळ पैसा नाही. बघू, काय होतंय मुलींचं.' हा होऊन गेला विषय. त्या वेळी हे कुठं तरी फिरायला बाहेर गेले होते. मग रात्रीच्या वेळी आम्ही जरा असं बसत होतो गप्पा मारायला. हे, मी आणि आई. हे बोलायचे, 'क्या माँजी, याह्याखानका क्या हुआ?' तर माँजीचं आपलं राजकारण गमतीनं सुरू व्हायचं सगळं. याला शिव्या दे, त्याला शिव्या दे असं व्हायचं. मग म्हटलं, आज गंमत झाली. माँजी म्हणते हो, एका मुलीच्या लग्नाला २५,०००/- पाहिजेत. तर तुम्ही जाण्याविण्याच्या गोष्टी करू नका हो. तुम्ही आधी इथं ५८,०००/- रुपये तयार

मी भरून पावले आहे : १५१