पान:मी भरून पावले आहे.pdf/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठेवा. मी कुठून आणू?' ही गंमत चाललेली. ते काय म्हणाले, 'नाही माँजी, हमारे शादीको पाच रुपये लगे न. तो हमारे बच्चोंकी शादी के लिए दस रुपये लगेंगे. इससे जादा क्या लगनेवाला है?' 'नहीं नहीं सब लोग देते है. वैसे तो देना पडेगा. लोग पिछले दरवाजेसे देते है.' तर हे काय म्हणाले, 'माझ्या घराला मागचं दारच नाहीये. तर मला काळजी नाही.' पण तिने तो जोक म्हणून घेतला नाही आणि ती भडकली. म्हणाली, 'म्हणून तर असला रोग झालाय तुला.' मला तिचं हे असलं बोलणं आवडलं नाही. एक पेशंट बसलेला. त्यांचा सुद्धा चेहरा बदलला. त्यांनी माझा हात असा दाबला. त्यांच्या लक्षात आलं, मला खूप वाईट वाटलं म्हणून. मी म्हटलं, 'माँजी, असं बोलायचं नसतं आणि तुला शोभत नाही असलं बोलणं. तू २५,०००/- चा हिशेब करते. तुझ्या किती मुलांची तू लग्न केली. आणि किती मुलांसाठी तू २५,०००/- खर्च केले? तू २५,०००/- खर्च केले असते तर आम्हा चार भावंडांसाठी तू एक लाख रुपये खर्च केले असते. तुझे लाख रुपये वाचले नं? त एका मुलीचं सुद्धा लग्न केलं नाही.' हे मी तोंडानं बोलले. हे मी बोलल्यावर तिला राग आला. रात्रभर झोपली नाही. आणि सकाळी बोऱ्याबिस्तरा बांधून 'मी इथं राहाणार नाही' म्हणून निघाली. मी पाया पडले, माफीसुद्धा मागितली. पण ती झटक्यानं पुण्याला निघून गेली. म्हणजे इतकं अंडरस्टैंडिंग सुद्धा तिच्यात नव्हतं. हा शेवट आला तेव्हा रडायला तेवढं सोपं पडलं. चार माणसं आल्यावर नुसता तमाशा दिसतो. तेव्हा मीच तिला सांगितलं का आता रडायचं काही काम नाहीये. सगळं आटपलेलं आहे आणि तू तमाशा करू नको. मग माझ्या नणंदेकडे फोन केला. तिच्याकडे माझ्या दोन मुली. ती घेऊन आली. रुबीना माझी फार समजूतदार म्हणून फुसफुस करत उभी राहिली. इला माझ्या मांडीवर बसलेली. लहान होती. घळाघळा डोळ्यांतून पाणी आलं. बाबा गेले म्हणून कळत पण नव्हतं तिला. खूप लहान होती. रुबीना १८-१९ वर्षांची, इला तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होती. हॉस्पिटलमध्ये यायची पण नाही. आली की रडत जायची. काही कळत नव्हतं. त्यांचं बघवत नसे. ती बाबांना बघते, माझ्याकडे बघते. माझे डोळे पुसते आणि सांगते, 'बाबांना आवडत नसे नं रडलेलं? बाबा मला सांगायचे – मला कोणी रडलेलं आवडत नाही. कोणी घरात रडायचं नाही. तुला पण म्हणायचे, मला पण म्हणायचे. आता रडायला नको हं. बाबा गेले म्हणजे काय झालं ग, ममा? काय झालं? तू कशाला ग रडते?' आणि तिच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते. म्हणजे तिला कळत नव्हतं का आपण हे काय बोलतो म्हणून. थोड्याच वेळात

१५२ : मी भरून पावले आहे