आणि ती रात्र आली शेवटची. दलवाईंच्या नात्यातला कादीर दलवाई म्हणून एक होता. उनाड मुलगा होता. पण त्याला इथे चांगल्या बँकेत-बिंकेत लावलेला होता. त्याने खूप चांगली सेवा केलेली होती. तो हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेस माझ्याबरोबर झोपायला असायचा. मला त्रास होऊ नये म्हणून एका बाजूला असा झोपलेला असायचा, रात्रभर जागायचा म्हणून मी उठायची नाही. तो उठायचा रात्री.
ती जी शेवटची रात्र होती तिच्या दोन-तीन दिवस आधी हे मी सगळं त्यांचं बघितलं आणि बेचैन झाले. तेव्हा संध्याकाळ झाली की व्हिजिटिंग अवर्स संपल्यानंतर सगळे जायचे. मग त्यांच्या रूमला बाल्कनी होती मोठी. तिथं उभं राहिलं का रस्त्यावरचं सगळं दिसायचं. कादीर आला म्हणून मी त्याला म्हटलं तू जरा बस, मी जरा बाहेर वाऱ्याशी उभी राहते आणि बाल्कनीत उभी राहिले. पण मला इतकं भरून भरून येत होतं. रडण्याची सोय नाही कुणाच्या समोर. आणि मग माझ्या तोंडातनं असं निघालं, की 'अरे बाप रे, ह्यांना एवढा त्रास होतो. हा माणूस सहन करू शकत नाही आणि आता माझ्यात बघण्याची सुद्धा ताकद उरली नाही. तर हा माणूस गेलेला बरा.' आता मला गिल्टी वाटतं. का तर मी एका माणसाचं मरण मागितलं. पण त्या वेळी मला असं वाटलं की नको रे बाबा हे सगळं बघायला. त्यांना सहन होत नाही आणि मला बघून सहन होत नाही. तर हा माणूस गेला तर बरं होईल. आणि आता काही उपाय राहिलेला नाहीये. हे चाललेलं आहे ते काही फार दिवस राहाणार नाही. तर हा माणूस गेलेलाच बरा. या माणसाचा जगून काय उपयोग आहे? हे माझ्या मनात येऊन दोन दिवस नाही झाले, तर हा शेवटचा दिवस आला. ती रात्र अशी बेचैनीत गेली. सारखं आम्ही नर्सला बोलावत होतो. सारखी बघत होती नर्स. पुन्हा गेली, अर्धा तास झोपली का पुन्हा ते असे खाली सरकायचे अन्ईझी होऊन. पुन्हा आम्ही त्यांना जागेवर सरकवत होतो. कादीर जागा, मी जागी, नर्स जाग्या. रात्रभर आम्ही जागेच होतो. आणि सकाळी असा जरा डोळा लागला ना माझा, त्यात ते कधी गेले कळलंच नाही. कसा माझा डोळा लागला कळलं नाही. पण मी अशी धाडकन उठले आणि जाऊन बघितलं. कादीरला म्हटलं, 'अरे बाबा उठ. डॉक्टरला बोलव. काही तरी घात झालाय, उठ.' डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं. सारं संपलं आहे. साडेपाच-सहाची वेळ होती सकाळची. मग मीच कादीरला सांगितलं, तू इथं बैस जरा. मी जाऊन जरा तोंडबिंड धुवून आले आणि पहिलं काम, डॉक्टरांना सांगितलं मला जरा काही फोन