पान:मी भरून पावले आहे.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माझा जन्म पुण्याचा. २५ मे १९३० रोजी माझा जन्म झाला. माझे आईवडील मुंबईला होते. आजी, आजीचं सगळं कुटुंब म्हणजे माझे काका, काकी हे सगळे त्या वेळी पुण्यात राहात होते. आजीनं मला मी ६ महिन्यांची असल्यापासून सांभाळलं. माझे वडील चांद खान पुण्याचे आणि माझी आई आयेशा पटेल. तिचं माहेर पुण्यालाच होतं. पण दोघं मुंबईला राहायची. ती लग्न झालं तेव्हा १७-१८ वर्षांचीच, लहान होती. आमचे वडील मिलिटरीमध्ये होते. १९१४ च्या लढाईमध्ये आमचे वडील होते. ४ थी - ५ वी पर्यंत मराठी शिकलेले होते. आई २-३ क्लासेस (उर्दूचे) शिकलेली होती. फार शिकलेली नव्हती. त्या काळामध्ये वयात बरंच अंतर असलेल्या लोकांचा सुद्धा विवाह व्हायचा आणि ते लग्न चांगलं टिकायचं. नाही असं नाही. मी ६ महिन्यांची असताना माझ्या आजीनं मला सांभाळायला घेतलं. का, तर माझी आई लहान होती. मूल सांभाळायचं फारसं माहीत नव्हतं तिला. एक दिवस आजीनं रात्री खोलीत जाऊन बघितलं तर माझ्या अंगावर दोन्ही पाय टाकून ती झोपली होती. मग आमची आजी म्हणाली की "काय ग बाई, ही तर मुलीला मारूनच टाकेल. कशी सांभाळते? दे इकडं माझ्याकडं", आणि आईनं मला आजीच्या ताब्यात दिलं. माझे आई-वडील मुंबईला निघून गेले. माझ्या आजीनं माझं संगोपन केलं. आजीनं माझे खूपच लाड केले, आई-वडील जवळ नाहीत म्हणून. पण तिला असं वाटत असेल, की ही आता आपल्याकडे आहे, म्हणजे हिचे आपणच आईवडील आहोत. आपणच चांगलं सांभाळायला पाहिजे. आता चांगलं सांभाळायचं म्हणजे काय? तर आमच्या घरामध्ये दोन खोल्या होत्या. दोन खोल्यांमध्ये मी आणि ती राहात होतो. ती स्वयंपाकपाणी सगळं करायची. परत तिचीही मुलं होती. माझ्या दोन आत्याही होत्या, त्यांची फॅमिली होती. एक आत्या मोठ्या बंगल्यामध्ये राहायची. आमच्या खोल्या त्या बंगल्यालाच लागून होत्या.

मी भरुन पावले आहे : १