पान:मी भरून पावले आहे.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याच कंपाऊंडमध्ये दुसरी मोठी आत्या, तिची सगळी फॅमिली राहायची. मोठ्या कंपाऊंडमध्ये असे हे सगळे एकत्र राहात होते आणि रोज एका खोलीमध्ये भेटत पण होते. म्हणजे स्वयंपाक नुसते वेगळे होते आणि राहाणं सगळं एकत्र होतं. अशा ठिकाणी आमचा स्वयंपाक व्हायचा, तर माझी आजी काय करायची, माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक करायची. कारण परवडायचं नाही सगळ्यांसाठी सारखा स्वयंपाक करायला. मी तिच्याकडे असल्यामुळे, लाडकी असल्यामुळे ती मला आवडणारं सुकं मटण माझ्यासाठी करायची. गरम गरम खिचडी करायची, त्याच्यावर शुद्ध तूप टाकायची. मेथीची भाजी मला आवडायची म्हणून ती करायची. मुलगी म्हणून नव्हे, तर आपल्या घरातला एक मुलगा समजून ती मला हे वाढायची, माझं सगळं अन्न वेगळं ठेवायची. पण बाकीची मुलं घरात फिरायची. त्यांना पण काहीतरी करायला पाहिजे. मग ती काय करायची? झुणका-भाकरी करायची, बोंबलाची चटणी करायची. खूप सगळं करायची आणि ते शिंक्यावर नेऊन ठेवायची आणि मुलं येता जाता ते खायची. अशा रीतीनं तेवढा भेदभाव ती करायची. त्या वेळी कधी ती आजारी पडलीच, तर सगळं काम मला करावं लागायचं. काम करावं लागायचं म्हणजे भांडी घासायची, धुणं धुवायचं, स्वैपाक करायचा. मी शाळेत असताना माझ्या हाताची नखं वाढलेली असायची, त्यांच्यावर मी लाली लावायची. आजी मला ही कौतुकंसुद्धा करू द्यायची. म्हणजे बंधनं नव्हती कुठलीच! हे करू नये, ते करू नये असा जाच नव्हता. तेवढी ती मला फॅशन वगैरे करू द्यायची. कधी भांडी घासली तर नखं तुटायची, हात खराब व्हायचे तेव्हा माझ्या आजीला खूप वाईट वाटायचं आणि हात बघून तिच्या डोळ्यांत पाणी सुद्धा येई. आपण आजारी पडलो आणि मेहरूला त्यामुळे एवढं काम करावं लागतंय, असं वाटून ती दुःखी होई. आमची आजी तशी काहीच शिकलेली नव्हती. पण लोक म्हणायचे की ती चांगली सुईण होती. लोकांच्या बायकांची बाळंतपणं करायची पण त्याबद्दल तिला त्या काळात पैसेबियसे मिळायचे नाहीत. धान्य, गूळ, खोबरं अशा वस्तू मिळायच्या आणि त्याच्यावर सगळं घर चालायचं. आता आमच्या आजीला दहा-बारा मुलं होती. त्या वेळी मुलांची लग्नं झालेली नव्हती. त्यामुळे तेही सगळं तिला सांभाळावं लागायचं.

 आमचे आजोबा मॅट्रिक झाले होते. त्या काळात ते ऑफिसमध्ये काम करायचे, क्लार्क म्हणून. ७ रुपये पगार होता.

२ : मी भरून पावले आहे