टंकलिखित प्रत प्रकाशनासाठी तयार झाल्यावर प्रकाशक म्हणून 'साधना प्रकाशनाखेरीज दुसरं कुठलंही नाव आम्हा दोघींच्याही मनात येणं शक्य नव्हतं. कारण हमीद दलवाई आणि त्यांचं कार्य ही दोन्ही साधना परिवारातच वाढली. साधनेत त्यांनी किती तरी लेखन केलं, साधनेच्या सभागृहात त्यांच्या अनेक सभा झाल्या, साधनेतील मित्रमंडळींनी त्यांना अथपासून इतिपर्यंत जिवाभावाच्या स्नेहाचा ओलावा दिला. तेव्हा साधनेतर्फे हे पुस्तक निघणं हा औचित्याचा परमबिंदू होता.
म्हणून मग मी प्रधान सरांना फोन केला. ते माझ्या घरीच आले. मी कसं कसं काम झालं आहे हे त्यांना सांगितल्यावर त्यांनी गुरुला शोभतील अशा हर्षभरित शब्दांत माझी पाठ थोपटली आणि हे पुस्तक प्रकाशित करण्याचं वचनच दिलं. कुमुद करकरे आणि कविवर्य वसंत बापट यांनीही प्रधान सरांचा हा विचार उचलून धरला आणि साधनेच्या परंपरेला साजेशा देखण्या स्वरूपात आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
आज पुरोगामी विचाराची सगळीकडून पीछेहाट होत आहे. अशा वेळी समाजकार्यकर्त्यांनी पुरतं ओळखायला हवं की ज्या लोकांत पुरोगामी विचार पोचवायचा त्यांच्याबद्दल आपल्या मनात निस्सीम ममता तर हवीच पण हे विचार त्यांच्यात नेल्याबद्दल ते देतील ती शिक्षा- मग ती कधी प्राणांतिकही असेल- भोगायची तयारीही हवी. या दोन्ही गोष्टींना हे पुस्तक साक्षीदार आहे.
आणखी एक विचार मनात येतो. हमीद दलवाईंना जितकं दुर्धर दुखणं झालं तितकं किंवा त्यापेक्षा कमी-जास्त कठीण असणारं दुखणं प्रत्येकाला होऊ शकतं. अशा वेळी तो रोगीच नव्हे तर त्याची शुश्रूषा करणारेही एकाकी पडतात हे दृश्य आपण नेहमी पाहातो. दलवाई दाम्पत्याला मात्र त्यांच्या ज्ञात-अज्ञात सखेजनांनी कधीही एकटं पडू दिलं नाही. त्यांच्यासाठी पैसा तर उभा केलाच पण दलवाईंच्या शुश्रूषेसाठीही असंख्य लोक सतत झिजले. त्यांचे डॉक्टर्स परिचारिकांसह या बाबतीत कुठेही कमी पडले नाहीत. असाध्य रोगाशी जणू एका मोठ्या समूहानं एकवटून झुंज दिली. या दाम्पत्याचं मनोधैर्य टिकायला या आधाराचं फारच मोठं साह्य झालं. प्राणांतिक संकटात सापडलेल्या व्यक्तीला समाज कशी कशी मदत करू शकतो ह्याचं हे पुस्तक हा एक वस्तुपाठच वाटतो मला.
तीन वर्षांपूर्वी अगदी ध्यानीमनी नसताना हातात घेतलेला हा प्रकल्प या पुस्तकाच्या प्रकाशनानं पुरा होत आहे. हे अवघड काम आम्हा दोघींच्या हातून खरंच पुरं झालं आहे यावर विश्वासच बसत नाही.
पण तसं झालं आहे खरं. आयुष्याच्या उतरणीवर पावलं टाकत असताना आम्हां दोघींनाही हा मोठा दिलासाच आहे.
- सरिता पदकी