पान:मी भरून पावले आहे.pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दाखवल्यानंतर लक्षात आलं की ती नागीण आहे. आम्हांला तोपर्यंत माहिती नव्हतं नागीण काय रोग असतो. तिथं डॉक्टरांनी सांगितलं हे असं असं असतं.

 तब्येत बिघडलेली होती तर आम्ही पुढचा विचार त्या पद्धतीनेच करत होतो. म्हणजे विचार करताना, आता हे गेल्यानंतर आपण काय करायचं हा विचार फार असायचा माझ्या डोक्यात. आणि जाणार हे नक्की होतं. त्यातून वाचणं शक्य नव्हतं. किडनी ट्रान्सप्लांट केलेलं असलं की २-३ वर्षांवर जात नाहीत हे माहिती होतं आणि हे दिसत पण होतं की दोन वर्षं पण हे जगणार नाहीत. इतकी धडधाकट यांची प्रकृतीही नव्हती. ते विचारायचे हे तू काय लिहितेस? तू काय करतेस? तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगायची, 'हे असं असं करते, फोन नंबरांची यादी करते, काय करू मग?' ते मिष्कीलपणे हसायचे. तुला शिक्षा आहे बघ. बरं झालं. बघ, आता मी जातो. त्यांना वाईट वाटायचं खरं. पण अशी चेष्टा वगैरे करून टेन्शन घालवायचे ते. आणि गंमत काय व्हायची, दिवसभर रुबीना हॉस्पिटलमध्येच येऊन थांबलेली असायची. तिला जवळ घेऊन म्हणायचे, बाब्या तू माझं सगळं कर. तिला हलायला द्यायचे नाहीत. तिच्याच हातून सगळं खाणंपिणं सगळं काय व्हायचं आणि मला बघितलं की राग यायचा त्यांना. का माहिती नाही. असा उगाच. म्हणजे स्वतःचा राग ते माझ्यावर काढायचे. दुखण्याचा राग, असा की, नको असताना आपल्याला जायला लागतंय. तर मी दाराच्या मागे बसायची. रुबीनाला म्हणायचे, 'गेली वाटतं तुझी आई कुठं तरी.' ती म्हणायची, 'काय बाबा, जवळ बसली की तुम्हांला नको असते आणि ती लांब गेली की तुम्ही विचारता. असं बोलू नका. तिला किती वाईट वाटतं बघा. असं बोलत जाऊ नका.' संध्याकाळ झाली की रूबीना जायची नि मी आत यायची. जवळ बसून असं डोक्यावरून हातबित फिरवला की म्हणायचे, 'किती ग बरं वाटलं! दिवसभर कुठं होतीस?' मी चिडायची, म्हणायची, 'हो, मी असताना तुम्हांला बरं वाटत नाही, तुम्ही सगळ्यांशी चांगले बोलता आणि मला मात्र दुखवता तुम्ही खूप. तेव्हा तुम्हांला काही वाटत नाही.' तर ते म्हणायचे, 'अग, सगळे मला बघायला येतात. त्यांच्यासमोर मी रडून दुःख दाखवू? ते बिच्चारे दुःखी होऊन जातील आणि परत येताना त्यांना विचार पडेल का परत कशाला आपण या माणसाकडे जायचं? तर तसं नको व्हायला. त्यांना आनंदात जाऊ दे. त्यांना दुखवू नको आणि तू शेवटी माझी आहेस ना? इतकं जवळ माझ्या कोणंय? त्यामुळे सगळा राग, रुसवा सगळं मी तुझ्यावर काढतो. तर तू मला समजून घे. तू असं करू नकोस. तू जवळ

१४४ : मी भरून पावले आहे