पान:मी भरून पावले आहे.pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आलीस की मला किती बरं वाटतं हे तुला माहिती नाहीये. पण मला हा त्रास सहन होत नाही ग. म्हणून मी तो राग तुझ्यावर काढतो.'

बेडसोअर्स झालेल्या होत्या. एवढे मोठे मोठे खड्डे हो. ठणकायचे ते दिवसभर - पाठीवर आणि त्यात सुया टोचलेल्या – ते दुखायचं. औषध-बिवषध असायचंच ना. त्यामुळे चिडचिड व्हायची दिवसभर. हे ठणकतंय, ते दुखतंय. कुशीवर होता येत नाहीये. अमूक करता येत नाहीय, आणि दिवसभर सतरा औषधं चालू आहेत. सतरा इंजक्शनं चालू आहेत. तो माणूस वैतागणार नाही का? तर वाटायचं काय हे आयुष्य आहे? पण संध्याकाळी सगळे आले की ते खुषीत वाट बघत असायचे. त्यांच्या मित्रापैकी बरेच यायचे. एक त्यांचा मित्र होता – लाला लजपतराय म्हणून. हे चांगले असताना तो नेहमी यायचा, म्हणजे कसं? तर हे रात्रपाळीतून यायचे तेव्हा त्यांना उशीर व्हायचा. वेळ झाला का मी वाट बघायची. कॉलनीत शिरले का झेंड्याखाली आमच्या कॉलनीतले सगळे लोक बसलेले दिसायचे. कोणी टाईमपास करायला, कोणी झोप येत नाही म्हणून. कोणी असंच भेटायला. आणि हे भेटले की त्यांना सोडायचे नाहीत. तर हे सगळं आटपून घरी यायला उशीर व्हायचा. मला ऑफिसला जायचं असायचं. माझी झोप व्हायची नाही. हा लाला लजपतराय यायचा ना, त्याचा येण्याचा टाइम रात्रीचा १२-१ चा असायचा. ती घरी आला ना की भाभीजान-भाभीजान करून अगदी चुलीच्या खोलीपर्यंत यायचा आणि खाणं-पिणं. म्हणजे खूपच तो यांच्यासाठी जीव टाकायचा. तो यायचा रात्रीचा. आणि त्याची बोलायची पद्धत पण प्यायलेला माणूस जसा बोलता ना तशी. तर तो आला की घरात गोंधळ नको म्हणून हे त्याच्याबरोबर उतरून खाली हॉटेलात जाऊन चहा पीत बसायचे. दोन तासांनी वर चढायचे. एकदा काय झाल! मला राग आला. म्हटलं काय माणूसय! इतक्या रात्रीचा येतो! आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना म्हणाले, 'काय हो तुमचा लाला! तो पिऊन-बिऊन येतो का काय? इतक्या रात्रीचा येतो. इतक्या रात्री दुसऱ्याच्या घरी जायचं असतं का? मला अजिबात आवडत नाही.' तो माणूस आवडत नाही असं नव्हतं माझं. पण तो रात्रीचा यायचा ते मला आवडायचं नाही. एवढं मी बोलल्यावर दोन दिवस माझ्याशी बोलले नाहीत हे. राग आला. जेवले नाहीत, बोलले नाहीत. मला काही कळेना. मग मी म्हटलं, काय झालं? मग एवढंच म्हणाले, 'जी बाई आपल्या नवऱ्याच्या मित्राबद्दल वाईट बोलते ती नालायक असते.' असे शब्द त्यांनी मला कधी वापरलेले नव्हते. तर त्याच्यावर मी म्हटलं काय झालं? ते म्हणाले, 'तू काय

मी भरून पावले आहे : १४५