पान:मी भरून पावले आहे.pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 फिरोजचा त्या देना बँकेमध्ये इंटरव्ह्यू झाला. जेमतेमच. त्याला काही येत नव्हतं. तिथं त्याला खूप मदत केली असं म्हणतात. इंटरव्ह्यू नॉमिनल झाला. त्याला तिथं घ्यायचं असं ठरलेलंच होतं. मग त्याला दलवाईंनी जवळ बसवलं. त्याला सांगितलं, तुला पगार किती मिळेल? इतका इतका मिळेल अंदाजाने. त्या पगाराचं तू काय करणार? मग सगळा हिशेब लिहून दिला त्याला. या पैशाचं अमुक करायचं. तमुक पैसा याच्यासाठी खर्च करायचा. अमुक पैसे असे खर्च करायचे. एवढं सगळं लिहून दिलं त्याला. हातात कागद दिला. मग मी जाऊन त्याला एस.टी. मध्ये बसवून आले. दोन दिवसांनी हे हॉस्पिटलमध्ये परत आले. चेकअपबिकप असायचंच. त्या वेळी तो नोकरीवर लागल्याची बातमी मिळाली त्यांना. फिरोज आता नोकरीवर जायला लागला तेव्हा जरा रिलीफ झाला त्यांना. ते म्हणाले, 'बरं झालं. नाही तर तू काय केलं असतंस एकटी राहून? एवढं पुरं पडलं नसतं. इतकी मुलं आहेत खायला-प्यायला. आता माझी काळजी मिटली.' आणि ते खूष झाले आपल्या मित्रांवर. कारण त्या सगळ्या मित्रांनी त्यांचा विचारच असा केला होता की जाता जाता तरी त्याला समाधान होऊ दे की माझ्या पाठीमागे माझ्या लोकांना त्रास होणार नाही. अशा रीतीनं सगळ्यांनी त्यांना मदत केली.

 एक दिवस काय झालं – तशी तब्येत बरी काय, वाईट काय असं चाललेलंच होतं – सकाळी हे उठले आणि म्हणाले, 'आज आपल्याला चेकअप करायला जायचंय.' ठीकय म्हटलं. म्हणून गंजिफ्रॉक काढून ठेवला आणि दाढी करायला लागले. दाढी करायला लागले तेव्हा मी बघितलं एक लाल रेघ अशी पाठीवरून पुढच्या छातीपर्यंत आलेली. तर मी म्हटलं, 'काय हो, हे काय उठलेलं? मच्छर चावला की काय?' पण मच्छर चावलेला नव्हता. ते म्हणाले, 'काय हे, चुरचुरतंय मला. काय आहे हे?' मी म्हटलं, 'आज जाणार आहात तिथं दाखवा बाबा. हे काय आणखी नवीन आहे?' आणि मग आम्ही हॉस्पिटलला चेकअपला गेलो.

मी भरून पावले आहे : १४३