Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाब्या, तुम्हांला आठवण येईल का रे बाबांची?' आणि ते बिचारे न कळत रडायचे असे ढसाढसा. दोन्ही पोरींसमोर. पोरींना कळायचं नाही.'बाबा, असं का बोलता तुम्ही?' कळवळून कधी कधी पोरी विचारायच्या.मी म्हणायची, 'काय हो तुम्ही, मोठे असून मुलींना घेऊन रडता, मुलींच्यावर काय परिणाम होईल? आता सगळं काही आपल्याला माहिती आहे. तरी तुम्ही असं करायला लागल्यावर काय होणार? तुम्ही असं रडू नका. मुलींना असं भासवू नका, का तुम्ही जाणार.'कधी कधी विनोद सुद्धा व्हायचा. काही खायचं असेल ना, 'मेहरू, तू अमूक वस्तू मला खायला दिली नाहीस. का खायला दिली नाहीस? हे बघ, मेल्यानंतर मुनकिर नकीर असे दोन फरिश्ते येतात. फरिश्ते म्हणजे एंजलस्. ते मेल्यानंतर येतात असं लिहिलेलं आहे. आणि ते विचारतात, 'अमुक अमुक केलंस? तमुक तमुक केलंस?' तर हे म्हणायचे मला, 'ते विचारणार मला, हमीदखान, तू अमुक अमुक खाल्लं? तमुक तमुक नाही खाल्लं? मी म्हणणार, मेहरूने मला हे नाही दिलं. माझी काय चूक आहे? तेव्हा तुझ्याही नावाला पाप नको. तू पण वर जाणारेस. तू हे असं करू नको. तुला शिक्षा भोगायला लागेल. तू आपली मला हे खायला दे.' म्हणजे विनोद पण त्याच्यात असायचा आणि जाणार ही जाणीव पण त्यात असायची. नंतर नंतर त्यांना वाटायचं पण, की आपल्याला जायला नकोय. पण जबरदस्तीन जाव लागतंय. हे वय आहे का मरायचं आपलं? म्हणजे कामाची उमेद केवढी! काम आता वाढलेलं आहे. मी अमुक करणार होतो, तमुक करणार होतो. मी काहीच करू शकलो नाही. हे काय वय आहे जाण्यासारखं? काय मी असं केलेलं आहे, का मला एवढी मोठी शिक्षा मिळायला पाहिजे, असं सतत म्हणत. शेवटी शेवटी तर झोपून झोपून बेडसोअर्स झालेले होते त्यांना, पाठीवर. पायाला तर ते डायलिसिसच मशीन लावायचे ना, तिथे एवढा मोठा खड्डा पडला होता. असे बोंबा मारायचे हात लावला तर ते! ड्रेसिंग करायला ती नर्स आली की दोन्ही हात माझे घट्ट दाबायचे आणि म्हणायचे 'तिला जाऊ दे. मला हात नको लावू देऊ. मला दुखवते. इतका दुखवते ती की मला नको वाटतं साफ करायला. नंतर तर कुशीलाही वळायचे बंद झाले ते. उताणेच असत आणि त्यामुळे बेडसोअर्स खुप झाले. शेवटी शेवटी मला म्हणायचे. 'मला घरी घेऊन चल. मला घरी घेऊन चल.'

 आमचे नातेवाईक बरेच यायचे. आता जोगेश्वरीलासुद्धा यांचे चुलतभाऊ वगैरे राहायचे. ते, भावजय-बिवजय यायची. ते भाऊबिऊ यायचे. तर हे सांगायचे ना, त्यांना घरी घेऊन जायला, तर ते भाऊ म्हणायचे चला आपल्या

मी भरून पावले आहे : १३७