पान:मी भरून पावले आहे.pdf/151

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 तब्येतीमध्ये चढउतार सारखेच. म्हणजे आता बोलता बोलता या माणसाला काय होईल याची गॅरंटी नसायची. खूपच टेन्शनमध्ये दिवस जायचे. का बाबा हा मनुष्य आहे, चार दिवस चांगला राहणार आहे असं कधीच झालं नाही. आमच्याकडे एक म्हातारी बाई होती कामाला. त्या वेळी ती पवारांकडे होती; स्वयंपाकाला आणली होती. पण कामचोर होती फार, त्यामुळं फार काम करायची नाही. हे काय म्हणायचे, 'तुला खूप त्रास होतो. असू दे ना. करते ते करू दे. तू फार लक्ष देऊ नकोस. तू माझ्याकडे आपलं बघ, तिला करायचं ते करू दे.' असं बोलायचे. पण व्हायचं काय? आम्ही आता जेवण केलं, समजा कोंबडी केली, तर मी काय करायची? टोपच उचलून मी असा टेबलावर ठेवायची. त्यांची कॉट अशी शेजारीच. टेबल असं इथे ठेवायची. प्लेट अशी, चमचा असा. तुम्हांला काय लागतं ते घ्या म्हणायची. म्हणजे ते उष्टं होतं का? आपण असं चमच्यानंच काढून घेतो ना! तुम्ही काढलं काय, नि मी काढलं काय? त्या चमच्याने काही आपण खात नाही. हातानं घेत नाही. चमच्यानं आपण घेतो नि बाजूला ठेवतो. सगळ्यांना वाढतो. पण नंतर नंतर ती बाई हात लावायची नाही त्या टोपाला. त्यांच्या ते लक्षात आलं. मुसलमान म्हणून नाही. हे आजारी होते म्हणून. मुसलमान म्हणून काय? काम तर ती करत होतीच ना, इतकी वर्ष. २-३ वर्षं ती होतीच आमच्याकडे ! मी समजावून सांगायची, हा पेशंट आहे. अग, आम्ही पण तेच खातो ना. त्यांच्यासमोर टोप का ठेवते? तर जी वस्तू त्यांना आवडते ती ते आपल्या हातानं पहिल्यापासूनच घेत आलेत. आमच्याकडे जेवणाची पद्धत पहिल्यापासून अशीच होती. त्यांच्या बाबतीत अमूक घाल, तमूक घाल असं मी शोधत बसायची. मग म्हणायचे 'दे ना टोप माझ्याकडे, मी शोधून माझं घेतो.' त्यांनी घेतलं की मग आम्ही घ्यायला मोकळे व्हायचे. म्हणून मग त्यांच्यासमोर आधी मी ठेवायची आणि मग सगळ्यांनी वाटून घ्यायचं. खायचं. पण ती बाई खात नसे. नंतर मी काढून टाकली तिला. कारण नंतर नंतर मला असं वाटलं की या बाईला जर रोगाची भीती वाटत असेल तर ही बाई आपल्या घरात नको. पेशंटला वाईट वाटेल. त्यांना वाटेल, माझा काय असा रोग आहे, का कुणाला लागण्यासारखा?

 नंतर नंतर, सुट्टीमध्ये मुली घरी आल्या का त्या मुलींना घेऊन खूप रडायचे ते. असे दोन्ही बाजूंना त्यांना घ्यायचे, मिठी मारायचे आणि म्हणायचे, 'मेहरू, मी मुलींसाठी काहीच केलं नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी सगळ्या जगासाठी झटलो ग. पण मी आपल्या मुलींचा कधी विचारच केला नाही. माझी पाखरं कशी ग मोठी होणार? त्यांना आठवण येणार का?

१३६ : मी भरून पावले आहे