घरी. मी म्हणायची, 'नाही बाबा, तो पेशंट उचलण्यासारखा आहे का? पेशंटला हलवायची सोय नाहीये. आपल्या घरी सोय नाहीये. तिसऱ्याकडे मी कुठं यांना नेऊ? मी परमिशन देणार नाही. मी तुम्हांला जाऊ देणार नाही. तुम्हांला एखादे दिवशी बरं वाटेल. पण एखाद्या दिवशी बिघडलं तर ते काय करणारेत?' आणि मला ही धास्ती की तिथं कुठं गेले, त्यांना काय झालं, तर नातेवाईकांना तेच पाहिजे. आमच्याकडे पद्धत काय? की कुणी मेला तर त्याला घ्यायचं आणि मयतीला गावात घेऊन जायचं, नि तिथं पुरायचं कबरस्तानमध्ये. आणि ह्यांना तर हे करायचं नव्हतं. त्यामुळे मी जाऊ दिलं नाही.
त्यानंतर ह्यांच्या डोक्यात आलं का आपण आपलं विल लिहिलं पाहिजे. एकदा रात्री दोन वाजता त्यांची तब्येत एकदम खराब व्हायला लागली, तर म्हणाले, 'उठ मेहरू, कागद पेन्सिल काढ. आणि मी सांगतो तसं लिही.' मला तर काय इंग्लिश शिवाय काही लिहिताच येत नव्हतं ना. त्यांनी सांगितलेलं मराठी मी लिहू शकत नव्हते. मग त्यांनी तीन पत्रं अशी माझ्याकडून लिहून घेतली. एकामध्ये असं, की मी मेल्यानंतर मला दहनही करायला नको, की दफनही नको. म्हणजे हिंदू पद्धतही नको नि मुसलमान पद्धतही नको. मला चंदनवाडीमध्ये नेण्यात यावं. भाषणबिषणं तिथे होऊ नयेत. कुठलाही विधी करता कामा नये. असं एक विल होतं. दुसरं एक महंमददा आणि त्यांचा मेहुणा खडस होता त्यांच्यासाठी. की तुम्ही दोघांनी भाभीच्या पाठीशी राहावं, लोक जे येतील गाववाले विरोध करायला त्यांना तोंड देण्यासाठी तिला मदत करावी. आणि तिसरं एक होतं शहांच्या नावानं की माझं सगळं झालं की माझ्या बायकोमुलांना ताबडतोब आपल्या घरी पुण्याला प्रोटेक्शन म्हणून न्यावं. ही तीन विल लिहिलेली होती. यामध्ये किती पुढचा विचार होता ! हे आज कळतंय मला. हे विल केलं नसतं आणि त्या वेळी मी तिथं राहिले असते तर आमच्या लोकांनी, मला जिवंत ठेवलं नसतं. काही तरी आमचा घात झाला असता आणि ते पवारांना जड गेलं असतं. त्यांच्या घरी प्रोटेक्शन होतं आम्हांला, त्यांच्या घरी नेण्याचं कारण हेच होतं की सगळ्या बाजूंनी प्रोटेक्शन असावं आम्हांला. यांच्या जीवाला भीती असे. आम्हांला त्रास होऊ नये म्हणून ते केलेलं होतं.
सकाळ झाली. महंमददा आले. नेहमीप्रमाणे हे विल त्यांना वाचायला दिलं. त्यांनी ते इंग्लिश करेक्ट करून घेतलं. टाईप करून घेतलं, स्टँँप केलं. आणि ते ९ एप्रिलला सगळ्यांना दिलं.