Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ऑपरेशनच्या अगोदरची एक आठवण आहे, काय झालं? आम्ही पुण्याला गेलो. शहासाहेबांनी बोलावलं होतं. दोन दिवस पुण्याला राहिलो. त्या वेळी पण डायलिसिस होत होतं. तर शनिवारचा डायलिसिस होता तो. सोमवारपर्यंत घेऊ या असं ठरवलं. शनिवार, रविवार सुट्टी घेतली आणि आम्ही पुण्याला आलो. गाडीनेच आलो. शहांकडे आलो. शहांनी केवढी तयारी घरी केली होती, त्यांच्यासाठी फुलं मांडून ठेवली होती. फ्रूटस् आणली होती. मी म्हणालेसुद्धा ‘काय शहासाहेब किती तयारी केली!' नाही, नाही त्याला हे फ्रूट लागणार आणि मग तो हे खाणार. मग तो अमूक करणार, तमुक करणार असा विचार करून सगळी तयारी केली होती. आणि दोन दिवस सगळी पुण्याची माणसं लोटली भेटायला. पहिला दिवस तर चांगला गेला. दुसऱ्याही दिवशी रात्री अकरापर्यंत हाच गोंधळ. उद्या सकाळी आम्ही मुंबईला जायला निघणार गाडीने. सगळे झोपले आणि मी बत्ती बंद केली. हॉलमध्ये आम्ही झोपलो होतो. थोड्या वेळाने उठले, म्हणाले, 'मेहरू जरा बत्ती पेटव,' 'काय झालं?' 'कसं तरी होतंय. मला श्वास लागलाय.' त्यांना ज्या गोळ्या देत असत त्यातल्या एका गोळीचा इफेक्ट असा होतो का त्यानं घाबरायला होतं. मी विचारले, 'का हो तुम्ही गोळी खाल्ली का ती? त्यानं असंच होतं. मी म्हटलं होतं आज गोळी खाऊ नका तुम्ही. आणि तुम्ही खाल्ली गोळी.' आणि थोड्या वेळाने बेशुद्धी आली त्यांना. ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं, जवळपासच्या. तपासल्यानंतर मग त्यांनी सांगितलं का हॉस्पिटलमध्ये रिमूव्ह करा. एवढा गोंधळ उडाला. सगळ्यांना वाईट वाटलं. हार्टबिर्ट बंद झालं की काय? अँब्युलन्स बोलावली. नगरकरांना बोलावलं. सगळे आले. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. ॲडमिट केलं त्यांना, झोपवलं. हार्टबीटस् बघायला दोन वाजले रात्रीचे. मग शहा आणि नगरकर गेले. जाताना माझी समजूत घालून म्हणाले, 'काही घाबरू नका. आम्ही घरात फोनजवळ आहोत. तुमच्याजवळ फोन आहे. तुम्हाला काहीही जरी वाटलं तरी आम्हांला ताबडतोब फोन करून बोलवायचं,' आणि मी आपली रात्रभर अशीच बसलेली. सकाळपर्यंत तब्येत नॉर्मल झाली थोडीशी. पु.ल. देशपांडे वगैरे होते. त्या वेळी पु.लं.च्याच गाडीनं आम्ही गेलो. सकाळी ते आले. जवळच्या हॉटेलात नेलं. मला त्यांनी नाष्टाबिष्टा, चहापाणी दिलं, मग गाडी आणली. गाडीमध्ये कुमार होता, कुमार सप्तर्षी, त्याला बरोबर घेऊन आम्ही तिथून सुटलो. मला त्या हॉस्पिटलमध्ये काही गोष्टी विचारण्यात आल्या, का यांना कोणत्या गोळ्या देता? मी म्हटलं 'हा या गोळीचा

१३४ : मी भरून पावले आहे