पान:मी भरून पावले आहे.pdf/150

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इफेक्ट असणार.' ते म्हणाले, बरोबर आहे. मी म्हणाले, 'हे बघा, तुम्ही कोणतं तरी औषध इथं तुमच्या परीनं द्यायचं नाही. त्यांची औषधं सगळी इथं आहेत. किडनी पेशंट आहे. तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन्स पाहिजे असतील तर जसलोकला फोन करायचा, या या डॉक्टरला बोलावयाचं. त्यांना विचारल्याशिवाय एकही ट्रीटमेंट मी इथं करू देणार नाही. म्हटलं, बाहेरची ट्रीटमेंट करायचीच नाहीये त्यांना.' असं मी सांगितल्यामुळे तिथे एक सरदारजी होते त्यांनी फोन केला. तिथं अॅडमिटकार्ड केलं. सांगितलं, घेऊन येतो पेशंटला. मग इथून गाडीमध्ये घालून आम्ही घेऊन गेलो जसलोकला. आणि मग जसलोकमध्ये नेऊन त्यांना टाकलं. त्या दिवशी डायलिसिसचा दिवस होता. केलं नाही पण दुसऱ्या दिवशी डायलेसिस केलं. मग ते नॉर्मल आले. असे प्रसंग किती तरी आहेत.
 दलवाई जेव्हा जेव्हा पुण्याला जायचे, तेव्हा तेव्हा ते पूनम हॉटेलात थांबायचे. ही व्यवस्था निळूभाऊ लिमये यांनी केलेली होती. येथे सगळी मंडळी जमा व्हायची. अन्वर शेख, अमीर शेख, सय्यदभाई, मुनीर सय्यद, रफिक शेख, फैज शेख, रसुलभाई, मकबूल तांबोळी आणि युक्रांदचे विवेक पुरंदरे, दिलीप भंडारे, माधव साठे आणि इतर काही लोक. विवेक पुरंदरे, दिलीप भंडारे व अरुण केळकर ह्यांनी तर दलवाई आजारी असताना हॉस्पिटलात ह्यांची खूप सेवा केली होती. त्यांच्यामुळे मला रिलीफ मिळायचा. दलवाईंचं ऑपरेशन झाल्यानंतर ते पुण्याला गेले होते. पूनम हॉटेलात थांबले. सगळी मंडळी आनंदाने त्यांना भेटायला आली. त्यांना आशा वाटली की चला, हमीदभाई बरे झाले आता. परत कामाला गती येईल. इथे अन्वर शेख आपल्या बायकोसहित आले होते. ते दलवाईंच्या फार जवळचे होते. त्यांना वाटले आज आपण दलवाईंशी खूप खूप बोलू या. पण दलवाई अपसेट झालेले दिसले. अन्वर शेखशी ते बोलले नाहीत. त्यांना वाईट वाटलं, ते निघून गेले. त्यांनी गैरसमज करून घेतला नाही. पण का आपल्याशी हमीदभाई बोलले नाहीत, या विचारात रात्रभर झोपलेही नाहीत. येथे दलवाईंनासुद्धा त्याची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी अन्वर शेखला बोलावले. आणि म्हणाले, 'अरे, मी तुझ्याशी काल बोललो नाही. तुझ्या बायकोशी मला खूप बोलायचं होतं. पण मी असा का वागलो ते मलाच कळत नाही. मला तू क्षमा कर.' अन्वर शेखचे डोळे भरून आले आणि त्यांना खूप बरे वाटले. दलवाईंनी आपल्या मित्रांना खूप जपले होते.

मी भरून पावले आहे : १३५