पान:मी भरून पावले आहे.pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही तर माझ्या मनात होतं तुला घड्याळ आणायचं. तू हे बोलली नसतीस तरी मला माहिती होतं तुझ्याकडे घड्याळ नाही. मी तुला घड्याळ आणून दिलं असतं.' एवढं हे गाडीमध्येच बोलणं झालं, घरी गेलो मग.
 तेव्हा घरात कोणी नव्हतं, नंतर मुलीबिलीपण आल्या. मुली आपापल्या हॉस्टेलला वगैरे होत्या ना. नंतर त्या आल्या, भेटल्या. चॉकलेट बिकलेट आणलं होतं. एवढे लिपस्टिक, पावडर तिथं काय लावतात, इथं काय लावतात. सगळं आणलं. मी म्हटलं हे काय? ते म्हणाले कोणाला माहिती कुठं काय लावायचं असतं? आणि म्हणाले की, मेहरू, तू काही लावू नकोस हे. आपण आपलं बाब्यालाच देऊ या. ती कॉलेजला जाते ना. करू दे तिला जरा नट्टापट्टा. हेच तर दिवस असतात मजा करायचे, आम्ही खूप केली मजा. तू केली का? मी तर कॉलेजमध्ये खूप मजा केली. हे आपण बाब्याला देऊ या. ती लावेल. तिनं लावलं तर मला आवडतं. म्हणून ते सगळं तिला दिलं. जर्मनीमध्ये, एक बाई कॉन्फरन्समध्ये आली होती, तिनं त्यांना आपल्या घरी नेलं होतं. आणि तिनं एक साडी दिली होती. ही साडी तुमच्या बायकोला द्या म्हणून. ती साडी अजून माझ्याकडे आहे. मी नेसली पण नाही. इतकी सुंदर की विचारायला नको. तिची उंची तर डोक्यापासून खाली पायापर्यंत अशी स्ट्रेच होते. आणि बारीक बारीक फुलांची इतकी सुंदर होती. ते म्हणाले, इतकी छान साडी तिनं तुला दिलेली आहे. तिने तुला पाहिलं पण नाही. तुझी ओळख पण नाही. पण तिनं सांगितलं की तुमच्या बायकोला माझ्याकडून द्या. जातील तिथं तिथं व्याख्यानं दिलीच त्यांनी.

 व्याख्यानांसाठीच गेले होते ते जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये. ते काम नसताना कधी कुठे गेलेलेच नाहीत. नुसत्या फिरायसाठी ते कधी गेलेच नाहीत. आणि गंमत अशी होते की अशी माणसंच कुठे गेली ना, की आपोआप माणसं त्यांना बोलवतात. बोलवतात म्हणजे कशाला? बोलायला, सभेत भाग घ्यायला. आपले प्रश्न मांडायला. याच्यासाठीच बोलवतात. त्यामुळे तसे ते फिरले. आणि ती ट्रीप त्यांची खूप छान झाली. चांगले सुधारले आणि डॉक्टरनी सांगितलं की आता तुमचं वजन जरा कमी करा. खूप वाढलेलं आहे. तब्येत खूप चांगली झालेली आहे. थोडं खाण्यापिण्यावर लक्ष द्या. आणि इथं आल्यावर तेवढा हवेमध्ये फरक पडतोच ना? एक वर्ष विदाऊट डायलिसिस खूप छान मिळालं त्यांना. त्याच्यातच मीटिंगा बिटिंगा घरात घेतल्या गेल्या. बाहेर तर फारसं जात नसत ते. गाडीतनं थोडं फिरायला गेलं तर, नाही तर कुठं नाही. किडनी सव्वा वर्ष चांगली चालली.

मी भरून पावले आहे : १३३