मुद्दे बरोबर मांडायचे आणि बोलण्याची टॅक्ट असल्यामुळे अडायचं नाही त्यांचं काही. बोल्ड होते तसे.
लंडनला मावसबहीण होती त्यांची, सगीरा. तिच्याकडे, तिनं जबरदस्तीने दोन महिने ठेवून घेतलं. चांगलं सांभाळलं. म्हणून ते तिच्याकडे राहिले. आमचं लग्न जेव्हा झालं ना तेव्हा बाहेरगावी गेले तर पत्र लिहायचे ते. भावांना लिहायचे आणि त्याच्यात मजकूर लिहायचे, भाभीला हे सांगा म्हणून. मला डायरेक्ट पत्र लिहायचे नाहीत. मी एकदा म्हणाले, काय हे, तुमची बायको शिकली सवरलेली आहे, नोकरी करणारी आहे. भावाच्या पत्रात मला का निरोप? मला एक वेगळं पत्र लिहू शकत नाही? हे त्यांच्या लक्षातच यायचं नाही. त्यानंतर ते काय करायचे माहिती आहे का? पोस्टकार्ड लिहायचे, मला वेगळं. मी म्हटलं, बायकोला पत्र लिहिताना पोस्टकार्ड वापरतात का? म्हणायचे, 'काय लिहायचं असतं त्याच्यात? मी काय प्रेमपत्र तुला लिहिणार होतो का? मला प्रेम तसं करता येतं का? तुला काय वाटलं प्रेम जसं सिनेमा-नाटकमध्ये चाललंय, तसंच प्रेम मी तुझ्यावर करणारे? हे काय मला जमणार नाही'. पण मी म्हटल्यानंतर मग इनलँड लेटर एवढं मोठं घ्यायचे नि दोन ओळी लिहायच्या नि बंद करून पाठवायचं. अशी पन्नास इनलँड लेटर अमेरिकेतून, लंडनमधून पाठवली. प्रत्येक पत्रात दोनच ओळी, काय तर, 'मेहरू, मी अमूक ठिकाणाहून तमूक ठिकाणी गेलो. तब्येत बरी आहे. काळजी करू नको.' सगळ्या पत्रांत हेच. आणि मला राग आला होता म्हणून मी एकाही पत्राचं उत्तर दिलं नाही. दिलंच नाही. नंतर ते झाले खूप अपसेट. खूपच अपसेट झाले. लंडनला आल्यानंतर त्यांनी महंमददांना दोनदा पत्र लिहिलं ना डिटेलमध्ये. आणि सांगितलं, काय झालंय मेहरूला? तिच्याकडे जाऊन बघ, तिला बरं नाहीये का? ती रागावली आहे का? तिनं मला का नाही पत्र लिहिलं? आणि महंमददा अगदी इमोशनल होऊन आले माझ्याकडे आणि मला म्हणाले, काकी, का हो त्रास देता त्याला तुम्ही? तुम्ही एकही पत्र लिहिलं नाही? तुम्हांला काय राग आहे? असं करू नका. मी तुम्हांला हात जोडतो. तुम्ही सांगा. मी मजकूर लिहितो. तुम्ही साईन करून पाठवा. पण हमीदला तुम्ही पत्र पाठवा.' आणि तेव्हा मी एक पत्र लिहिलं. दोन ओळींचं पत्र आणि पाठवलं. काय लिहिलं हे पण आता लक्षात नाही. पण त्यांच्या लक्षात आलं की ही रागात आहे म्हणून तिनं पत्र नाही लिहिलं.
लंडनला माझी बहीण राहत होती. तेव्हा तिचा पत्ता दिला होता आणि सांगितलं होतं की तुम्ही तिकडे गेल्यानंतर माझं एक काम करायचं. मला हातातलं घड्याळ नाहीये. ते पाठवायचं. बरं म्हणाले.
भरून पावले आहे : १३१