पान:मी भरून पावले आहे.pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि मला वाटतं बहिणीला त्यांनी फोन केला. तिथं गेले आणि बाय चान्स माझी वासवानी म्हणून सिंधी मैत्रीण होती. ती त्या वेळी तिकडे गेली होती, ती जाताना मी तिला म्हटलं, बहिणीचा पत्ता असा असा घे. दलवाई तुला तिथं भेटतील. काय माझ्या नवऱ्याला गरज लागली तर तू द्यायचं. आल्यावर मी बघेन, त्या परक्या गावात त्याचं कोणी नाहीए. तर तू देखरेख करायची. ती फार चांगली मैत्रीण होती माझी. म्हणजे सुरुवातीपासूनची. ती म्हणाली, 'तू काही काळजी करू नको. मी बघेन, आणि तिकडे गेल्यावर तिनं दलवाईंचा शोध घेतला. बहिणीकडे नेलं. तिनंच नेलं. आणि यांनी सांगितलं का मेहरूनं घड्याळ मागितलंय असं असं. तिनं फारसं लक्षच नाही दिलं. आणि ती फारसं चांगलं वागलीही नाही असं त्यांचं म्हणणं. त्यांना एक सवय होती ना, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. पण मला माझ्या मैत्रिणीनं थोडीशी हिंट दिली की तू तुझ्या नवऱ्याला याबद्दल काहीही विचारू नको. तिथं काही बरोबर पाहुणचार झालेला नाही. त्यामुळे मी काही बोलले नाही. तुला वाईट वाटेल म्हणून ते सांगणार पण नाहीत. मला तू विचारू नको. त्यांनी मला पण सांगितलं की, मेहरूला तू हे बोलू नको. वाईट वाटेल. म्हणून ते सांगणार पण नाहीत.

 ते जेव्हा परत आले तेव्हा एअरपोर्टवर त्यांना घ्यायला गाडीभर माणसं. पवारांची गाडी घेऊन आम्ही गेलो तिथं. सगळे पुढे गेले. मी मात्र काचेच्या मागे उभी राहिले. ह्यांनी बघितलं येताना. तब्येत बिब्येत चांगली मस्त झाली होती. आल्यानंतर माझ्याकडे नुसतं बघितलं. काही बोलले नाहीत. आम्ही गाडीत बसलो. यांच्या हातात दोन घड्याळं होती. त्यांच्या हातात एक घड्याळ होतं तरीही त्या मावसबहिणीनी त्यांना घड्याळ दिलं होतं. ते म्हणाले पण, हे बघ माझ्याकडे एक घड्याळ आहे, काय करणार मी याचं? मला देऊ नको. ती म्हणाली, 'काही नाही, एक घड्याळ अन् एक शर्ट घ्या' ते म्हणाले, 'खादीशिवाय मी काही घालत नाही, कोण घालणार तुझा हा शर्ट?' 'तुम्ही कोणालाही द्या. पण आम्हांला तुम्हाला द्यावासा वाटतोय म्हणून मी आणलाय.' यांनी आल्याबरोबर घड्याळ माझ्या हातात घालत मला सांगितलं, 'माझे आई, याच्यापुढे कोणतीही वस्तू मला आणायला सांगू नकोस, तुझ्यासाठी एअरपोर्टवर मला खोटं बोलायला लागलं.' मी म्हटलं, 'काय झालं?' 'मला विचारलं, तुम्ही काही आणलंय का? मी नाही म्हणून सांगितलं. समजा त्यांनी माझी तपासणी केली असती आणि ही दोन घड्याळं निघाली असती तर कुठं राहिलो असतो? असं काम आयुष्यात कधी केलेलं नाही आणि तू म्हणालीस म्हणून मी तुझ्या बहिणीला घड्याळ आणायला सांगितलं होतं.

१३२ : मी भरून पावले आहे