Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण सगळी औषधं तिकडेच सहजपणे मिळायची. डॉक्टर म्हणाले, 'आता खा, मौज मजा करा. फक्त इनफेक्शन होऊ देऊ नका.' साधारणपणे कशाने इनफेक्शन होतं ते पेशंटला माहिती असायला हवं. अशी सगळी तयारी झाली. तयारी झाली तर नगरकरांना वाटत होतं, हमीदला एकट्याला कशाला पाठवा? तिथं कोण बघणार त्याला? तर ही पण जाईल. भाभी पण जाईल बरोबर. म्हणून 'तुमची पण तयारी करा. तुम्ही पण त्याच्याबरोबर जा हं.' असं मला म्हणाले पण नगरकर वहिनी म्हणाली, 'कशाला भाभीला पाठवता? त्यांना नका पाठवू. भाभी खूप कंटाळलेली आहे. ऑफिस सोडून दोन वर्षं बसलेली आहे घरी. आणि तिची रजा पण तेवढी झालेली आहे. दोघांना जरा बाजूला करा. म्हणजे ती पण जरा फिरेल बिरेल. मैत्रिणींमध्ये मजा करेल. हमीदचं सगळं करून ती नाही का कंटाळलेली? तिचा कोण विचार करणार? तिला तुम्ही पाठवूच नका.' हे पण म्हणाले की नको ही माझ्या बरोबर. मी एकटाच जाणार. मला खूप राग आला यांचा. कारण हे असं नाही म्हणाले, की मी जाताना मेहरूला बरोबर घेऊन जातो म्हणून. मला खूप वाईट पण वाटलं आणि राग पण आला की यांचं इथं करायला मी हवी पण बाहेर जायला नको, मी गेले असते कॉन्फरन्समध्ये यांच्या बरोबर तर काय झालं असतं? असं मला वाटलं पण नाही गेले मी. यांची सगळी तयारी केली. म्हणजे लोकांनीच यांची तयारी केली. कपडे शिवले. खादीच्या शिवाय तर कपडे घालत नव्हते. खादीचाच पँट-शर्ट. मग कोट आणि पँट मात्र खादीची नाही शिवली. म्हणाले, एवढा कॉस्टली कशाला? आल्यानंतर तर मी घालणार नाही. कशाला एवढं कॉस्टली शिवायचं? मग नाईलाजाने बिनखादीचे कपडे शिवले. सगळी तयारी लोकांनीच केली त्यांची. आणि त्यांना पाठवून दिलं. तिथं गेल्यानंतर पन्नास ठिकाणी ते गेले असतील. सगळ्या मित्रमंडळींना माहीत, आजारी माणूस इकडे येणार आहे. प्रत्येकानं त्याला सांभाळून घेतलं. कॉन्फरन्सला हजर राहिले. कॉन्फरन्स संपल्यावर एकानं बोलवायचं, येण्या-जाण्याचा खर्च संपूर्ण द्यायचा, दोन दिवस ठेवायचं,सगळीकडे फिरवायचं आणि परत थोडेसे पैसे खिशात घालून दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं. असं करून त्यांच्या फिरण्याची सोय केली.असे अमेरिकेत तीन-साडेतीन महिने राहिले. एकूण सगळ्यांकडे राहिले. कॉन्फरन्स खूप चांगली झाली. बोलले. म्हणजे इंग्लिशमधून भाषण.मोडकी तोडकी इंग्लिश. असं नाही मला हे येत नाही, ते येत नाही. हिंदी, उर्दू पण तशीच बोलायचे. मराठी फक्त फ्ल्युएंट असायची. बाकी सगळं कामचलाऊ.

१३० : मी भरून पावले आहे