पान:मी भरून पावले आहे.pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तीच वेळ खराब आल्यावर कोणी विचारेल असं नाही. आपल्या नात्यागोत्यामध्ये, मुलाबाळांमध्येसुद्धा हे व्हायला लागलेलं आहे. पण ह्यांनी जी मित्रमंडळी जमा केलेली होती ती इतकी चांगली होती की त्यातला एकसुद्धा मला असा सापडलेला नाही, की ज्याला वाटलं असेल, दलवाई जातोय ते बरं आहे. आपण कशाला भेटायला जावं, असं कुणाला वाटलेलं नाही. सगळे म्हणायचे, आमच्या हयातीपेक्षा त्याचं जिवंत राहणं फार जरुरीचं आहे. काळाला फार गरजाय त्याची. आणि या माणसाला कुठल्याही परिस्थितीत आम्हांला वाचवायचंय. नगरकर वगैरे तर हे सारखं सांगायचे. ऑपरेशन जेव्हा झालं ना, त्या वेळी माझा भाऊ कराचीला, त्यामुळे नगरकर दादा तेव्हा म्हणाले, का त्याला कळवू या. पण त्याला कळलेलं होतं अगोदर. कसं कळलेलं होतं मला माहिती नाही. या काळात माझी आई कराचीला होती. सगळी कराचीला होती. नंतर माझे वडील आईला सारखं सांगायचे तू जा, तिची सोबत कर. तेव्हा ती आली होती. हे जायच्या आधी वर्षभर आई माझ्याकडेच होती पण मनात जी दलवाईंबद्दल आढी होती ना, ती ते मरेपर्यंत गेली नाही. आणि भावाला ऑपरेशन करायचं कळल्यानंतर, भावाने फोन केला. सांगितलं का हमीदभाईंना इकडे घेऊन ये. आम्ही त्यांचं बघू. नगरकरांना हे कळलं. ते म्हणाले, काही हरकत नाही. इथं ऑपरेशन नाही करायचं. फॉरेनला जाऊन करायचं. मी म्हटलं, 'अजिबात नाही करायचं. तुमच्यापेक्षा आणखी जवळचं कोण आहे मला? माझ्या लोकांच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. आणि त्यांच्या पैशावर तर माझ्या नवऱ्यानं न जगलेलं बरं, तो गेला तरी चालेल. पण त्यांच्या पैशावर तर त्याला जगवायचं नाहीये. तुम्ही जे काय त्याचं करणार आहात, ते करा. तुम्ही सगळे माझ्याबरोबर असल्यामुळे मी इथे उभी आहे. मी एकटी जाऊन काय करणार? मला काही समजणार नाही. आणि हा माणूस जो काही चार दिवस जगणार ना, तो एका दिवसामध्ये आटपेल. मेहेरबानी करून असं काही करू नका. त्यांच्या स्वाधीन मला करू नका.' ते म्हणाले, तसं नाही. मी म्हणाले, मी ऐकणारच नाही तुमचं. आणि मग ते म्हणाले, 'जाऊ दे, असं जर असेल ना तर आजपासून मी तुझा भाऊ. तू मला भाऊ समजायचं.' आणि गंमत अशी की वारंवार माझ्याकडे यायचे. म्हणायचे, "तू रड, मला शिव्या दे. मला बोल, पण मन मोकळं कर तुझं. कोणी तरी आहे तुझं असं समज. आम्ही तुझेच आहोत की नाही? कशाला मेहरू, तू संकोच करते? जसा आमचा हमीद, तशी तू आहेस आम्हांला. फार लांबची नाहीयेस.” फार फारच इमोशनल व्हायचे ते.

१२८ : मी भरून पावले आहे