पान:मी भरून पावले आहे.pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इतकी काळजी लागून राहिली की या पेशंटला आता काही झालं तर मी काहीच करू शकणार नाही. माझीच चूक. की हे बोलले नि मी त्यांच्याबरोबर निघाले. आपण म्हणायला हवं होतं, की आपण जायचं नाही एकटं म्हणून. पण काय करणार? तिथं उभं राहिले आणि मी म्हटलं कुठल्यातरी प्रायव्हेट गाडीला आपण हात करायचा- किती वेळ थांबवण्याचा प्रयत्न केला, कुणी थांबायला तयार नाही. एक गाडी थांबली, तीन चार माणसं त्यात होती. आणि एक कोण तरी त्यांच्यातला यांच्या ओळखीचा. 'हमीदभाई, काय इकडे कुठे? काही हरकत नाही. चला, आम्ही तुम्हांला पोचवतो.' आणि त्या लोकांनी आम्हांला घरी आणून पोचवलं. त्याच्यानंतर मी ठरवलं, रात्रीबेरात्री एकटं आपण यापुढे कुठंही जायचं नाही. खाणं-पिणं ठीकय. घरात जेव्हा वहिनीला सांगितलं, तेव्हा वहिनी म्हणाली, 'इतकं सगळं ओढवून घेण्यापेक्षा तुम्ही फोन करायचा होता. तुम्ही बाहेर गेलात ते मला माहिती होतं की नाही? असे प्रसंग तर येणारच. मग तुम्ही असं वाटून घेतलं तर काय उपयोगाचं? अशा वेळी आम्ही तुम्हांला मदत नाही करायची तर कधी करायची? कशाला तुम्हाला काकी, असं वाटलं? त्या वेळी काही झालं असतं दलवाई काकांना, तर तुम्ही काय केलं असतं? साहेबांनी मला तासडलं असतं, बोलले असते मला, की तुझं लक्ष नाही. त्यांना जाऊ कसं दिलंस? तर हे सगळं तुम्ही करायचं नाही. आणि यापुढं कधीही जरूर लागली तर तुम्ही आम्हांला सांगायचं.'

 आणखी एक आठवतंय मला, जेव्हा यांना ऑपरेशन करायला थिएटरमध्ये नेलं ना, तेव्हा यशवंतराव चव्हाण डॉक्टरांना भेटले आणि त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की माझी एक इच्छा आहे. मी हमीदच्या ऑपरेशनच्या वेळेला त्याच्याजवळ असावं. त्यांनी खूप आग्रह केला. पण डॉक्टर म्हणाले, ते शक्य होणारच नाही. इन्फेक्शनची इतकी भीती असते की तिऱ्हाईत माणूस ठेवला तर ऑपरेशन होऊच शकणार नाही. तर आम्ही तुम्हांला परवानगी देऊ शकत नाही. त्या बिचाऱ्यांना आत जाऊ दिलं नाही. यशवंतराव चव्हाणांची नि दलवाईंची सुद्धा खूप गट्टी होती. नेहमी येणं-जाणं बोलणं. वसंतराव नाईकांची पण गट्टी होती. शंकरराव चव्हाणांची पण होती म्हणजे भेटणंबिटणं असायचं त्यांच्याशी. सर्वांशी त्यांनी चांगले संबंध जोडले होते. एवढ्या सगळ्यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे. त्यांनी मित्रमंडळी खूप चांगली जमा केली होती भोवती. आता काय होतं, चांगले दिवस असले का माणूस चांगलं बोलतोच, चांगलं वागतोच.

मी भरून पावले आहे : १२७