खरं तर शहा साहेबांना सगळे खूप घाबरून असायचे. पण माझे त्यांनी खूप लाड केले आणि मी काही बोलले ना, तर खूप कौतुकानं घ्यायचे. उलट ह्यांनाच ते बोलायचे 'नाही, नाही. ती बोलते ना ते बरोबर आहे. तुझंच काही तरी चुकत असेल बघ. तू असं नाही तर तसं कर ना, हमीद!' अशी ते समजूत घालण्याचा प्रयत्न करायचे आम्हा दोघांची. पवारांचं काय व्हायचं? पवारसाहेब जरा शाय होते, फार फ्रीली काही बोलायचे नाहीत. पण मनापासून त्यांना खूप वाटायचं, माझ्या मुलीबिलींना जवळ घ्यायचे, खूप लाड करायचे. त्यांची मुलगी तर इतकी प्रेमळ होती का तिला जर खायला दिलं ना, तर सगळाच्या सगळा खाऊ ती आमच्या घरी घेऊन यायची. दोघी मुलींना ती माझ्यासमोर घेऊन बसवायची आणि पोटभर खायला घालायची. मोठी जी रुबीना होती ना तिच्याशी तिची गट्टी होती. आणि धाकटीशी नेहमी तिचं भांडण व्हायचं. माझी धाकटी मुलगी म्हणायची, 'मिनिस्टरची मुलगी असली तर काय झालं? म्हणून तिनं असं करायचं का काय? मला नाही आवडलं, वहिनी नेहमी तिचीच बाजू घेतात. मला नाही आवडत.' आणि वहिनी नेहमी चिडवायच्या 'ही ना रुबीना, आमची आहे. आमच्यासारखी आहे. ही इला ही तुमच्यासारखी आहे. ही अशीच करते. बघा, तिला नाही आवडत. ती तुसडी आहे. तुमची लाडकी आहे' असं उगाचच घरातल्या घरात आमचं हे चालायचंच. कुठली ना कुठली गोष्ट बाहेर दिसली ना, का वहिनी प्रेमाने रुबीनाला आणून देणार, मुलींनी खाल्लं की नाही, मुलींना कपडे आहेत का नाहीत, मुलींना अमुक आहे का नाही हे पवार जातीनं बघायचे. आणि ते वारंवार बायकोला असंही बोलायचे की भाभीचा खर्च कसा चालतो, ती खाते का नाही ते बघ.
ऑपरेशनमधून बरं झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का यांना हवा बदलायची. कुठंतरी पाठवायचंय. तर हवा बदलायला कुठं जाणार? त्या वेळी मला आठवण आली का आमच्या घरी दोनएक वर्षांआधी दलवाई आजारी पडायच्या अगोदर फिलाडेल्फियाचा कॉल आला होता. दलवाई तिथं जाणार होते.
सगळ्या मुस्लिम देशांची कॉन्फरन्स होती. कुठल्याही कॉन्फरन्समध्ये आपली बाजू, आपला प्रश्न मांडता येतो, जाणार म्हणून तयारीत होते आणि आजारी पडले. मी म्हटलं, 'हे सगळे पेपर पडलेले आहेत. अजून कॉन्फरन्स आहे. ते जाण्यायेण्याचा खर्च देणार आहेत.' आणि मग तयारी झाली त्यांची सगळी, पासपोर्ट काढणं वगैरे. म्हणजे सगळं एका दिवसामध्ये होत होतं. सगळे ओळखीचेच होते. त्यामुळे, आणि औषधपाण्याचा प्रश्नच नव्हता.
मी भरून पावले आहे : १२९