पान:मी भरून पावले आहे.pdf/141

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खूप रक्त गेलं. मग दुसऱ्या दिवशी रूममध्येच आणून रक्तबिक्त दिलं, खूप गेलं म्हणून. मग सकाळी त्यांना बरं वाटलं. मग म्हणाले. 'बाप रे, आपण ते जेवलोबिवलो होतो ना, त्यामुळे मला असा त्रास झाला.' तो एक प्रसंग अगदी अंगावर काटा उभा करण्यासारखा आहे. आणि त्याच्यातनं हे वाचले. म्हणजे हॉस्पिटलमध्ये असताना किती वेळा हा माणूस मेला आणि मरणाच्या तोंडातनं डॉक्टरांनी याला किती वेळा बाहेर ओढलं असेल, याची गणतीच नाही.
 डायलिसिसवर होते ना तेव्हा एक दिवस जो बरा जायचा तेव्हासुद्धा आम्ही इकडेतिकडे फिरायला जात असू. फिरायला म्हणजे हात धरून धरून एकमेकांचा, गाडीत बसून. हे गाडी चालवायचे आणि हॉटेलात जायचे. त्यांना चायनीज जेवण खूप आवडायचं. मला पण त्या वेळी खूप आवडायचं आणि कुठं काय चांगलं मिळतं ते पण त्यांना बरोबर माहिती असायचं. त्यामुळं त्या बाजूच्या हॉटेलात जायचं, ऑर्डर करायची. आपण तर फार खायचे नाहीत, दोन घास खायचे. आणि सगळं माझ्यासमोर ढकलायचे. आणि म्हणायचे, 'खाऊन घे. मी गेल्यानंतर कोण तुला आणणारे? कोण तुझे चोचले करणारे? कोण तुला प्रेमानं खायला घालणारे? असं तुला मिळणार नाही, खाऊन घे.' त्यांना मरणाची कल्पना होतीच. पहिल्यापासूनच कल्पना होती का आज नाही तर वर्षांनी दोन वर्षांनी, सहा महिन्यांनी आपण जाणार. आपण काही फार काळ राहातच नाही. प्रश्नच नाही. याची दोघांनाही कल्पना होती.

  एक दिवस काय झालं, आम्ही चर्चगेटला ते कॅमलिंग हॉटेल आहे, चायनीज, तिथं जायचं ठरवलं, आणि जाताना पवारवहिनींनी आम्हांला सांगितलं, मी गाडी देते. तुम्हाला गाडीनं ड्रायव्हर सोडेल. आम्हांला त्यांने कॅमलिंगला सोडलं. सोडताना आम्ही त्याला सांगितलं, आम्हाला परत न्यायला काही तू येऊ नकोस, आम्ही टॅक्सीनं जाऊ. आम्ही तिथं जेवलोबिवलो. आणि बाहेर पडलो. टॅक्सी दिसेना. काय झालं? तर टॅक्सीचा संप होता. रात्रीचे दहा साडेदहा- चर्चगेटला उभे राह्यलोय, आणि गाड्यांचा संप आणि हे काय म्हणाले, 'नको बाबा, पवारांकडे फोन करायचा आणि गाडी मागवायची ही किती वाईट गोष्ट आहे. ते म्हणतील हे आजारी आहेत, आपण यांचं सगळं करतो नि यांना एवढाही सेन्स नाही का, अशा वेळी बाहेर जाऊ नये. आपल्याला माहिती असतं तर निघालोही नसतो. किती त्या लोकांना आपण त्रास देणार? हे काय बरोबर नाही.' काय करायचं? गाडी तर मागवायची नाही. टॅक्सी तर मिळत नाही. आता आपण काय करणार? मला

१२६ : मी भरून पावले आहे