काय ओलं लागतंय सगळं.' आणि बत्ती लावल्यावर बघितलं तर सगळं रक्त फिश्चुलातून वाहत होतं. कसा तो फुटला कळलंच नाही. काय करायचं आता? मी तसाच त्यांचा शर्ट गुंडाळला हातावर आणि बाहेर आले. हवालदार सगळे बसलेले असायचे, पवार साहेबांचे. नुकतेच पवारसाहेब येऊन आपल्या रूममध्ये वर गेलेले मला माहीत होतं. गाडी आलेली ऐकली होती. हे बोललेसुद्धा, 'शरद आला वाटतं. आत्ता आला. बघ किती वेळ झाली. आता यानंतर तो जेवणार बिवणार.' हे आम्ही बोलतोय. ते आपल्या रूममध्ये गेले होते. मी हवालदारांना बोलवून सांगितलं ताबडतोब गाडीची व्यवस्था करा. टॅक्सी आणा नाही तर आपली गाडी काढा. काहीही करा. गाडी आणली. चार लोकं आली. दलवाईना असं गुंडाळलं. मी डॉ. कुरुव्हिलांना आणि डॉ. कामतांना ताबडतोब फोन केला, हे असं असं झालेलं आहे, काय करू? ते म्हणाले, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या, आम्ही येतो. आम्ही ह्यांना घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर रूम बुक केली. त्यांना स्ट्रेचरवर घेतलं नि तिथून परत डॉक्टरांना फोन केला. मी हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. आता काय करू? आम्ही येतो म्हणाले. ते आले. डॉ. रायबागी म्हणून एकजण होते त्यांनी लगेच अटेंड केलं. ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. नेल्यानंतर अॅनेस्थेशिया दिल्याशिवाय तर होत नाही ऑपरेशन! आता हे जेवलेले. सगळं झालं. चांगलं झालं पण मग ओकाऱ्या सुरू झाल्या. जेवलेलं अन्न सगळं बाहेर पडलं, त्यांना त्रास झाला. एरवी असं रिकामं पोट असलं तर त्रास होत नाही. आणि ऑपरेशन थिएटरमधून रूमपर्यंत आणीपर्यंत असा आवाज जोरात ओकाऱ्यांचा की सगळं हॉस्पिटल हादरलं. रात्रीच्या दोन अडीचचा टाइम. आणि मी? मला काही सुचेना, काय करायचं? काय झालं असेल यांचं? नि का बोंबाबोंब होतेय? काही समजेना. सगळे पेशंट बाहेर येऊन उभे राहिलेले बाजूबिजूचे. काय या पेशंटला झालंय, कोणाला काही कळेना. ते रूममध्ये आले स्ट्रेचरवरून. दलवाईंना त्यांनी पलंगावर ठेवलं, आणि ह्यांनी मला जवळ ओढली. माझे केस ओढले नि दोन्ही हातांनी धरले आणि मला म्हणाले, 'माझे आई. मी मेलो तर तू सुटणार. तू काय काय माझं बघणार आहेस? आणि किती सहन करणार आहेस?' डोळे असे लाल लाल भडक झालेले. म्हणजे या माणसाला काय झालं हे किती वेळ कळेना. मी म्हटलं, 'डॉक्टर काय झालं यांना? काय केलं तुम्ही यांचं? का हा माणूस असं करतोय?' तर ते म्हणाले, 'घाबरू नका. ॲनॅस्थेशिया दिल्यामुळे हे असं असं झालेलं आहे. घाबरायचं कारण नाही.'
मी भरून पावले आहे : १२५