Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यामुळे काहीही त्यांच्या कानावर घातलं तरी ते नाही म्हणून म्हणायचे नाहीत. मोठे मोठे लोक ह्यांच्या मागे असल्याने डॉक्टर नाही म्हणायचे नाहीत. तर मी त्यांना सांगायची की उद्या मीटिंग आहे. डिसचार्ज पाहिजे. मी सकाळी नेणार, संध्याकाळी परत आणणार. असं करून सकाळी उठल्यानंतर डिसचार्ज घेऊन घरी जायचं, म्हणजे टॅक्सी आणायला मी जायच्या अगोदर त्यांची इथे तयारी बियारी करून सगळी प्रोसिजर संपेपर्यंत मी खाली जाऊन जसलोकच्या तिथूनच भाजीपाला सगळं काय काय पाहिजे ते घ्यायची, वर चढायची. यांना घेऊन घरी यायची. घरी आल्यानंतर यांना ठेवायचं आणि स्वयंपाकाला लागायचं. का तर आत्ता माणसं येणारेत. त्यांना जेवायला वाढायचंय. पुष्कळ वेळा, मुकादम खूप मदत करायचे. भाभी, तुम्ही काळजी करू नका म्हणायचे. त्यांच्या फॅमिलीला घेऊन यायचे. ते घरून करून आणायचे. असं चालायचं. आणि मग मीटिंग व्हायची. सगळे जमा व्हायचे कार्यकारिणीचे. त्याच्यात बाबूमिया बँडवाले नेहमी असायचे. बाबूमिया बँडवाले खूप वृद्ध माणूस. म्हणजे आता ८५-८६ त्यांचं वय आहे. यांच्यापेक्षा डबल वयाचे होते ते. पण यांना ते खूप मानायचे. दोघांची आवड एक – गाण्याची.
 बाबूमियांचा बँडवाल्याचा धंदा होता. त्यांची मुलं, त्यांची सगळी फॅमिली नाटकात काम करत असे. आणि ते फ्रीडम फायटर होते. काँग्रेसचे कार्यकर्ते होते. पण त्यांना पेन्शन गव्हर्नमेंटने जी दिली होती ना, फ्रीडम फायटरची, त्यांनी घेतली नाही. सांगितलं- 'मी याच्यासाठी काम केलेलं नाहीए. मला त्याचा मोबदला नकोय.' त्यांची मुलंबिलं सगळी बँडची कामं करायची. हे पण ते वाजवायचे. श्रीगोंद्याचे ते राहणारे. दलवाईंवर खूप प्रेम. पत्र गेलं की बाबूमिया आलेच. आणि मीटिंग झाली की दोन दिवस राहायचे. मग मी बाबूमियांना पोहोचवायची. एस.टी.त नेऊन बसवायची. आणि यांना नेऊन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायची. मीटिंग झाली की तो दिवस खूप चांगला जायचा. सगळे जमा व्हायचे. हे बोलायचे. पडल्यापडल्याच बोलायचे.

 हे पलंगावर, एका खोलीमध्ये मीटिंग व्हायची. कामात मन तेवढंच होतं. तिथं काही हॉल, आणि पन्नास माणसं नव्हती. दहा माणसं जमा व्हायची. दहाबारा माणसं, एवढ्याशा खोलीमध्ये बसवायची. आणि त्यांना बोलायला काय? खाणंपिणं, मौजमजा, बोलणं त्या निमित्तानं. ती लोकं आली की तेवढंच आपल्याला बरं वाटायचं. म्हणायचे, की काय बरं वाटतंय मेहरू, हे लोक आले की. आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी त्यांना ॲडमिट करायची.

मी भरून पावले आहे : १२३