असं कैकदा झालंय. आणि एकदा तर इंदिरा गांधींचं ते इलेक्शन होतं ना, आणीबाणीनंतरचं. त्या इलेक्शनची तर खूप धूमधाम सगळीकडे होती, की कोणता पक्ष येणार? आणि काँग्रेस न येता जनता पक्ष निवडून आला. त्यामुळे सगळे जण खुषीतच होते. ह्यांचं तर हॉस्पिटलमध्ये बसल्या बसल्या कौंटिंग चालू. हा डॉक्टर आला, तो डॉक्टर आला. म्हणायचे, ह्याला इथे बरोबर इतकी मतं पडतील. सगळी बघायला लागली. तोंडात बोटं घालून. आणि रिझल्ट जेव्हा रात्रीचा लागणार होता त्या दिवशी डिसचार्ज घेऊन आम्ही घरी गेलो. सबंध रात्र जागलो. किती माणसं होती घरात. रात्रभर बसून, आणि विचारायची ‘दलवाई, हा उभा आहे, याची कौंटिंग किती?' दलवाई सांगायचे, आणि ते बरोबर निघायचं. म्हणजं इतकं ॲक्युरेट त्यांचं रीडिंग होतं, का या माणसाला इतकी मतं मिळणार आहेत. सगळ्या भारतभरचं ठाऊक होतं. याला किती मिळणार, अमक्याला किती मिळणार. आणि सकाळी तो डिक्लेअर झाला रिझल्ट तेव्हा म्हणाले, 'मी काय म्हणत होतो!' हे रिझल्ट आम्ही ऐकले आणि पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. म्हणजे अशा रीतीनं हे सगळं चाललेलं होतं.
काही ना काही काँप्लिकेशन्स असायचीच. काँप्लिकेशन्सना तिथं तोटाच नव्हता. कुठे होणार, काय होणार, कधी होणार? काही सांगता यायचं नाही.
तो हातावर फिश्चुला केलेला होता ना. दोन नसा बसवण्यासाठी, तिथे धगधग आवाज यायचा, त्याला फार जपायला लागायचं. मला एक सवय होती. मी डॉक्टरांना सगळं खोदून खोदून विचारायची, की तुम्ही हे करून ठेवलेलं आहे. ते फुटतंबिटतं का? तर डॉक्टर म्हणाले, हो. मग मी म्हटलं, काय करायचं मग? काय होतं? तर म्हणाले, बाई, सगळ्या शरीराचं रक्त बाहेर पडतं. याला फार जपायचं असतं. कुठे धक्का लागता कामा नाही. त्याची फार भीती असते. पण दलवाई प्रत्येकाला कुणी आलं ना, की ये ये गंमत दाखवतो असं म्हणून ते सगळ्यांना दाखवायचे. थडथड थडथड उडायचं ते. ते फुटलं की ऑपरेशन करावं लागतं आणि मग ते पुन्हा जोडावं लागतं. _ एके दिवशी काय झालं, आम्ही घरीच होतो. हे मला म्हणाले, ‘मासेबिसे चांगले आणतो.' यांनी जाऊन मासे आणले. मासेबिसे केले. संध्याकाळची वेळ. आम्ही मस्त दोघंही जेवलो. त्यांना मासे आवडायचे खूप. जेवण झालं. गप्पाबिप्पा झाल्या. तब्येत खूप चांगली होती. आणि रात्री अकरा-साडेअकरानंतर ते झोपले. १५ मिनिटं झाली बत्ती विझवून. तेवढ्यात ते म्हणाले, 'मेहरू ऊठ.