Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते पाकीट घेतलं आणि ताबडतोब शहा साहेबांच्या हातात दिलं, की हे त्यांच्या खात्यामध्ये घाला. हॉस्पिटलच्या. म्हणजे त्यांना मिळालेला तो चेक त्यांच्याचसाठी वापरला गेला.
 आणखी त्याच वेळी असं व्हायचं की हॉस्पिटलमध्ये बडबडायचे एकटे. आपण विचारलं, काय हो बडबडताय एकटे? तर म्हणायचे की, “मेहरू, मी असे डोळे बंद केले की मला वाटतं खूप लोकं माझ्यासमोर उभे आहेत आणि मी भाषण करतोय."
 म्हणजे असं सारखं त्यांचं काम त्यांना मिस होत होतं. कुठे तरी भास होत होते. आणि वाटायचं की ही सगळी संधी आपण घालवली की काय? मी तेव्हा असंसुद्धा सांगायची, 'अहो, तुम्हाला बरं असतं ना तेव्हा आपण रेकॉर्ड बिकॉर्ड करू या. कोणाला तरी बोलावू या. तुम्ही लिहायला सुरुवात करा. तुमच्या आईबद्दल लिहायचं होतं तुम्हांला. हे सगळं करा.' पण त्यांना मूड यायचाच नाही. म्हणजे आज मला कळतं की माणसाला मूड आल्याशिवाय माणूस लिहू शकत नाही. ज्या माणसाला आपलं मरण समोर दिसतं तो या सगळ्या गोष्टींचा विचार कसा करील? त्यामुळं त्यांनी ते लिहिलं पण नाही. बरे झाले असते ते तर एखादे वेळी असं वाटलं असतं, की परत तब्येत बिघडायच्या अगोदर आपण सगळं आटपू या. असं त्यांचं झालेलं नाही. आणि आपण काम करू शकत नाही हे फील व्हायचं त्यांना. कितीदा तरी असं व्हायचं की आता जरा बरं वाटतंय, बरं वाटतंय, पण डिसचार्ज मिळाला की लगेच हॉस्पिटलमध्ये यायला लागायचं. चार दिवस हॉस्पिटलचे, दोन दिवस घराचे. पंधरा दिवस हॉस्पिटलचे एक दिवस घरी. असं पण झालेलं आहे बरेच वेळा तर जेव्हा घरी यायचे तेव्हा आम्ही बोलायचो हे पोस्टकार्ड घ्या आणि सगळ्यांना पत्रं टाका. आपण मीटिंग घेऊ या. चार दिवसानंतरची मीटिंग घेऊ या. चार दिवसांत काय तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात नाही. असं करून डेट फिक्स करायचे ताबडतोब ते सगळ्यांना पत्र लिहायचे. मी टाकून यायची. पण एकएक वेळी असं झालं की ज्या दिवशी मीटिंग आहे त्याच्या आदल्याच दिवशी ह्यांना अॅडमिट करण्यात आलं. आता उद्या मीटिंग आहे, काय करायचं? प्रश्न पडायचा. 'काय करायचं मेहरू?' मी म्हटलं, काही नाही करायचं. थांबा जरा. मग मी युक्ती काढली. हे दोन डॉक्टर इतके हाताशी चांगले होते की काहीही बोललं की ते ऐकायचे.

 डॉ. कुरुव्हिला आणि डॉ. कामत. फार मोठे डॉक्टर.

१२२ : मी भरून पावले आहे