पान:मी भरून पावले आहे.pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काही वेळानं बाई बोलायच्या थांबल्या. किती तरी वेळ लागला पुन्हा या काळात, या जगात यायला. मी म्हटलं, "बाई, हे अनुभव नुसते तुमच्यामाझ्यात नकोत राहायला. हे लिहून काढा. सगळ्यांना कळू देत."
 "कसं लिहिणार? मला लेखन तर सोडाच; साधी मराठी लिपीही येत नाही." त्या म्हणाल्या.
  "मग कॅसेटवर रेकॉर्ड करा. आत्ता मला सांगितलंत तसं." मी मार्ग सुचवला.
 “करीन, पण प्रश्न विचारायला तुम्ही पाहिजेत. किंबहुना हे सगळंच काम तुम्हीच अंगावर घ्यायला पाहिजे." बाईंनी अट घातली. माणसं जर मोकळेपणानं बोलायला लागली तर केवढं तरी महत्त्वाचं सांगून जातात याचा पुष्कळ अनुभव माझ्या गाठीशी होता. मी मेहरुन्निसाबाईंना होय म्हटलं आणि पुन्हा भेटायचं ठरवून त्या हुसेन जमादारांबरोबर निघून गेल्या.
 ते धगधगते अनुभव माझ्यापर्यंत त्यांनी इतके नेमके पोचवले होते की त्या गेल्यानंतर मला अतिशय खोल अशा उदासीनतेनं गिळून टाकलं. दोन दिवस जणू माझा मुक्काम विद्युद्दाहकावरच होता!
 उदासीनतेचं मनावरचं गच्च मळभ थोडं निवळल्यानंतर या दाम्पत्यानं केलेल्या संघर्षातली भव्यता माझ्या लक्षात यायला लागली. काय-काय केलं या दाम्पत्यानं? मस्तक मृत्यूच्या दाढेखाली सापडलं असतानाच आपल्या मृतदेहाची व्यवस्था कशी लावायची हे पतीनं पत्नीकडून लिहवून घेतलं आणि पत्नीनं ते तंतोतंत पाळलं. ही अंत्यव्यवस्था ज्या नातेवाईकांवर जिवापाड प्रेम केलं, ज्यांची चिंता सतत वाहिली त्यांना आवडणार नाहीच हे ओळखून, त्यांनी आपल्या पत्नीला आणि मुलींना छळू नये म्हणून त्यांच्या संरक्षणाची सोय केली. आपल्या मृत्यूनंतर कुणाकुणाला फोन करायचे याची यादी पतीनं सांगितली आणि पत्नीनं त्यात स्वतःची भर घालून ती लिहून घेतली! आपल्या मृत्यूनंतर भाषणे होऊ नयेत, फक्त इस्लामवर संशोधन करणारी एक संस्था स्थापन व्हावी अशी इच्छा मृत्युशय्येवरून पतीनं व्यक्त केली आणि संपत्ती जवळ नसतानाही पत्नीनं आपल्याच घरातली जागा त्या संस्थेसाठी देऊन टाकली. संकटांची पिसाट वृष्टी जेवढी भयंकर तेवढाच ती झेलणारा पर्वतही भक्कम आणि बेलाग. हाही अनुभव साऱ्यांसमोर यायला हवा असं मला प्रकर्षानं वाटलं.

 दलवाई दाम्पत्याची दोघांचीही बालपणं, विवाह, संसार, दलवाईंचं लेखन आणि समाजकार्य, दलवाईंचं दुखणं आणि मृत्यू, त्यानंतर मेहरुन्निसाबाईंचं कार्य आणि भूमिका असं सगळं या पुस्तकात यावं असं मला वाटलं. त्या दृष्टीनं मी प्रश्न विचारत गेले. पण बाईंना स्वतःलाच सगळं सांगून डोक्यावरचं आयुष्यभराचं ओझं हलकं करण्याची एवढी मोठी ओढ होती की मला फारसे प्रश्न विचारावेच लागले नाहीत.

००तेरा००