Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या बोलत गेल्या- मोकळेपणानं, सच्चेपणानं. या सांगण्यामागे संताप नव्हता की सारवासारव नव्हती. जे घडलं, जे सुखदुःख भोगलं ते तसंच्या तसं सांगितलं अशीच पद्धत होती. मेहरुन्निसाबाईंच्या निवेदनात सलगपणा रहावा म्हणून या पुस्तकात माझे प्रश्न घातलेले नाहीत.
 मेहरुन्निसा खान आणि हमीद दलवाई यांच्या कौटुंबिक पूर्वपीठिका अगदी भिन्न. पण एकदा लग्न केल्यानंतर मेहरुन्निसाबाईंनी दलवाईंचे आई-वडील, भावंडं इतर नातेवाईक या साऱ्यांना आपलं म्हटलं आणि त्यांच्यासाठी करता येईल तितकं तनमनधनानं केलं. दलवाईंच्या असंख्य मित्रमंडळींना त्यांनी आपलेपणानं धरून ठेवलं. एवढंच नव्हे तर समाजकार्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या पार्श्वभूमीतून येऊनही त्यांनी पतीचे विचार आत्मसात केले. त्याच्या हयातीत तर त्याच्या कार्यात साथ दिलीच पण त्याच्या पश्चातही ते कार्य चालवण्याची त्यांची अविश्रांत धडपड चालू आहे.
 हमीद दलवाईंनीही आपल्या मिळवत्या पत्नीचा मान राखला. केवळ एक अर्थार्जन करणारं यंत्र एवढीच किंमत तिला दिली नाही. दलवाईंनी स्वतः घरकाम केलं नाही पण पत्नीला त्याची तोशीस पडू नये याची काळजी घेतली, तिच्या कष्टांची जाणीव ठेवली. आपल्या कार्यात त्यांनी तिला हळूहळू समाविष्ट करून घेतलं. आपल्यासाठी तिनं जे जे केलं त्याची त्यांनी मनापासून पावती तिला दिली. त्यामुळेच मेहरुन्निसाबाई म्हणाल्या की मी भरून पावले आहे. किती समाजकार्यकर्त्यांच्या पत्नींना असे धन्योद्गार काढण्याचं भाग्य मिळतं हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे!
 हे पुस्तक मेहरुन्निसाबाईंच्या आठवणींचं आहे. आठवणी सांगताना थोडं इकडं, थोडं तिकडं होतं, फापटपसारा होतो. हा फापटपसारा मी छाटून टाकला खरा पण पुस्तक छपाईला देण्याआधी आणि मुद्रितांच्या स्वरूपात आल्यावर असं दोनदा त्यांना शब्द न शब्द वाचून दाखवून त्यांची मान्यता- 'मला जे सांगायचं होतं ते सारं माझ्या शब्दांत आलं' अशी- घेतलेली आहे. या दोन्ही वाचनांत सौ. ज्योती जोशी यांनी अगदी मनापासून सहभाग घेतला.
 हे मेहरुन्निसाबाईंनी सांगितलेले शब्द आहेत. त्यांची अशी मराठीची वेगळीच धाटणी आहे. मातृभाषा पुणेरी उर्दू, शिक्षणभाषा उर्दूच आणि महाराष्ट्रात राहत असल्यामुळे मराठी भाषा आपली मानली ती पतीच्या आग्रहाखातर, वयाच्या तिशीला. या साऱ्यांमुळे भाषेचं एक वेगळंच रसायन मेहरुन्निसाबाईंच्या बोलण्यात दिसून येतं. त्यात 'सुधारणा' न करता आम्ही ते जसंच्या तसं ठेवलेलं आहे. हे एक बोलपुस्तकच आहे आणि जाता-जाता हेही सांगायला हवं की मुसलमान स्त्रीचं- निदान मराठीतलं तरी- पहिलंच आत्मचरित्र आहे.

००चौदा००