पान:मी भरून पावले आहे.pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हमीद दलवाईंचं ते अकस्मात उघडकीला आलेलं प्राणान्तिक दुखणं, त्यांनी त्या दुखण्याशी केलेला झगडा, त्यासाठी त्यांच्या मित्रांनी केलेली जिवापाड धडपड, त्या साऱ्यांना आलेलं अपयश, एका नुकत्याच बहरू लागलेल्या विचारवंत समाजकार्यकर्त्याचा तो काळजाला चटका लावणारा अंत, त्या मृतदेहालाही त्यांच्या तत्त्वासाठी द्यावी लागलेली झुंज हे आता सर्वज्ञात आहे.
 मेहरुन्निसा दलवाईंबद्दल मला विशेष आस्था होती कारण त्यांनी जन्मभर नोकरी केली आणि हमीद दलवाईंना- नेहमी समाजकार्यकर्त्यांच्या भाळी जे लिहिलेलं असतं ते मिंधेपण भोगावं लागलं नाही. आपल्या तत्त्वनिष्ठेच्या जोरावर ते समाजात ताठ मानेनं वागलेच पण त्या निःस्पृहतेला मेहरुन्निसाबाईंच्या नोकरीमुळे असलेल्या आर्थिक स्वतंत्रतेचंही पाठबळ होतंच.
 दलवाई गेल्यावर मेहरुन्निसाबाईंची नि माझी फार तर एखादी भेट झाली असेल. ती देखील 'साधने'च्या कार्यालयात. त्यामुळे त्यांच्याबद्दल, त्यांच्या मुलींच्याबद्दल वर्तमानपत्रांतून कधी काही तुरळक वाचण्यापलीकडे आमचा संबंध राहिला नाही.
 साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. माझं त्या वेळी मुस्लिम सत्यशोधकचे कार्यकर्ते श्री. हुसेन जमादार यांच्या 'जिहाद'च्या संपादनाचं काम चालू होतं. त्या वेळी ते आमच्या घरी यायचे. एके दिवशी संध्याकाळी ते मेहरुन्निसाबाईंना बरोबर घेऊन आले आणि मधल्या वर्षांचं अंतर तुटून गेलं. आता आम्ही दोघीही संसारातल्या सुखदुःखांनी तावूनसुलाखून निघालेल्या प्रौढ स्त्रिया झालो होतो. अर्थात मेहरुन्निसांनी जे ताणतणाव भोगले होते ते लोकविलक्षणच होते.
 आगत-स्वागत झालं आणि गप्पांना सुरुवात झाली. एके काळी अबोल असलेल्या मेहरुन्निसाबाई आता अगदी मोकळेपणी बोलू लागल्या होत्या.
 बोलताबोलता विषय निघाला दलवाईंचं शेवटचं आजारपण आणि मृत्यू या बद्दलचा. कमालीच्या हालअपेष्टा सोसायला लावून आलेला तो मृत्यू. त्यानंतर स्वतःच्या जातवाल्यांशी तत्त्वनिष्ठेसाठी करावं लागलेलं घनघोर युद्ध, या साऱ्यांचं दुःख इतकी वर्षं लोटली तरी अगदी ताजं होतं मेहरुन्निसाबाईंच्या मनात.

 आपले त्या वेळचे ते रुद्रभीषण अनुभव त्या जणू क्षणाक्षणानं पुन्हा जगू लागल्या. शब्दांसाठी कुठेही न अडता भराभरा सांगू लागल्या आणि ते शब्दही कसे तर त्या चरचरीत अनुभवांना घट्ट मिठी मारणारे, थेटच भिडणारे. त्या कातरवेळच्या गडद गडद होत जाणाऱ्या काळोखात मेहरुन्निसाबाईंचं जणू त्या काळात, त्या प्रसंगांत शिरून स्वतःशीच बोलणं चालू होतं आणि त्या कथनानं माझा गळा गच्च पकडला होता. चढत्या काळोखात ती पकड अधिकाधिकच गळ्यात रुतत गेली. श्वास अडकला. त्या दाम्पत्यानं भोगलेलं ते दुःख ऐकतानाही सहनशक्तीच्या पलीकडे गेलं, भानच जणू निसटून गेलं.

००बारा००