मिळाला.' त्यानं सगळी विचारपूस केली. माझा स्टॉप आल्यावर मी खाली उतरल्यावर म्हणाला, 'नाही नाही, मी घरी सोडतो तुम्हांला.' त्यानं मला घरी सोडलं. शहासाहेबांना सांगितलं की असा असा माणूस मला घरी सोडून गेला. शहासाहेब म्हणाले, नाही. आजपासून तुम्ही असं रात्रीचं एकटीनं यायचं नाही. मग ते टॅक्सी घेऊन माझ्यासाठी यायचे. मला घेऊन घरी जायचे. माझ्याबरोबर जेवायचे. शहासाहेबांनी खूप केलं. का तर ह्यांना आपल्या मुलासारखे समजत होते ते. इतकं प्रेम एखाद्या माणसाला असू शकतं याची मला कल्पनाच नाही. सख्खं नातं नाही, एक रक्त नाही. ते म्हणतात ना, रक्ताचं नातंबितं, असं काही नसतं. त्यांनी मग निर्णय असा घेतला की भाभीनं इथं रहायला नको. व्यवस्था जवळ करू. सोय कुठं करायची? तर रामटेकला पवारसाहेब होते. तिथं गेस्टहाऊस बरीच होती. त्यांनी मला तिथं नेलं न् विचारलं की इथं रहाणार का? तर पवारवहिनी म्हणाल्या की, 'जेवणखाण सगळं या वेगळं कुठं करीत बसणारेत? मीच सगळं करीन.' मी म्हटलं, "नाही, मला तुम्ही सगळं वेगळं द्या. माझं मीच सगळं करून घेईन. एवढा भात टाकीन. माझी मुलं इथं नाहीयेत. हे हॉस्पिटलमध्ये. मी एकटी आहे. माझं मी कसंही करून घेईन. डोकं टेकायला जागा पाहिजे." ते घर हॉस्पिटलपासून जवळ होतं. म्हणजे बसनंच जावं लागायचं, पण फार लांब नव्हतं. शहासाहेबांच्या घरापेक्षा हे जरा बरं पडत होतं. कधी कधी टॅक्सीनं गेलं तरी परवडायचं. त्या वेळी शरद पवार एक साधेच मिनिस्टर होते.
ठरलं तसं आम्ही तिथं रहायला आलो. सामानबिमान आमचं सगळं आणलं. सामान मांडलं सगळं. पण हे हॉस्पिटलमध्ये जास्त रहायचे न घरी तर कमीच रहायचे. मला घरी आल्यानंतरसुद्धा काय करायचं हा प्रश्नच पडायचा. मग मी काय ठरवलं? रोज मी नाहीच घरी यायची, रात्रीचंसुद्धा तिथंच रहायची. दोन दिवसांनी घरी यायची. आंघोळ करायची. कपडे बदलायची. माझ्या जेवणाखाणाचे खूप हाल व्हायचे. हॉस्पिटल खूप महाग. नुसत्या नास्त्याला पाच रुपये पडायचे. त्या काळात पाच रुपये म्हणजे खूप होते. आज पाच रुपयांना किंमत नाही. जवळपास उडप्यांची हॉटेलं. डोसा खा, इडली खा, सांबार खा. पैसे जास्त पडतात म्हणून कमी खा. मला कुणी असं सांगितलेलं नव्हतं की कमी खा. उलट शहासाहेब, नगरकर असे म्हणायचे की तुम्ही तुमच्या खाण्याची आबाळ करायची नाही. हमीदसाठी जो पैसा उभा होईल त्यातच तुमचा हा खर्च मांडला जाणार आहे. तुम्ही बिनपगारी रजेवर आहात तर तुम्हांला पगार मिळणार नाही हे गृहीत धरलेलं आहे.
मी भरून पावले आहे : ९९