पान:मी भरून पावले आहे.pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्ही तुमचे हाल करायचे नाहीत. दलवाईंना खाण्याचा, हॉटेलचा, फार षौक होता. कुठल्या हॉटेलमध्ये काय चांगलं मिळतं ते पण माहीत असायचं. दुपार झाली की मला सांगायचे की, “मेहरू, तू अमुकअमुक हॉटेलात जा. ते अमुक अमुक ठिकाणी आहे. तिथं अमुक अमुक वस्तू मिळते, ती खाऊन ये." अन् कधी कधी मी जाऊन खाऊन आले की म्हणायचे; "कसं होतं? मी काय म्हटलं होतं? कशी चव लागली?" त्यांना खायला हॉस्पिटलचं जेवण होतं. ते चांगलं होतं. तिथं स्वयंपाक करणाऱ्यांपैकी एक मुसलमान होता, एक पारसी होता, एक ख्रिश्चन होता. मग सगळ्या त-हेची जेवणं मिळायची. त्यांना एकच होतं की मीठ खायचं नाही आणि पाणी प्यायचं नाही. मीठ अजिबात नाही आणि पाणी लिमिटेड. एक माप होतं, ते नर्स घेऊन यायची तिकडे. ग्लासभर पाणी घेतलं, प्यायले, असं नाही. जेवणबिवण फर्स्टक्लास आणायचे. चिकनबिकनचे असे पीसेस. सगळं चांगलं असायचं. सुरुवातीला ते खायचे. पण नंतर नंतर जेव्हा जाईनासं झालं तेव्हा एका प्लेटीत वेगळं काढायचे. ते मी खायची. त्यांचं उष्ट खायचं नाही. त्यांचं वेगळ्या प्लेटीत काढून ठेवायचं आणि बाकीचं आपण खायचं. एकोणीस का वीस रुपये एका टायमाचे होते तेव्हा. आता पन्नास रुपयांना तसलं जेवण मिळणार नाही. इतकं मस्त जेवण असायचं. फ्रूट, गोड वगैरे त्यांना सांगितलं असेल तसं असायचं. माझे मात्र खूप हाल झाले. खूप खायला नको वाटायचं. दुसरे देतात म्हणून फुकट खायला नको वाटायचं. कशाला आपण त्यांचा खर्च वाढवायचा, असं वाटायचं. एकदा कुमार सप्तर्षीने मला काहीतरी हजार-बाराशे रुपये आणून दिले. म्हणाला, भाभी हमीदचा तर सगळा खर्च निभतो. त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुमच्याकडे कुणाचं लक्ष कसं असणार? तुमचं घरात कसं चाललेलं आहे हे मी समजू शकतो. म्हणून मी प्रोग्रॅम घेऊन हे पैसे जमा केलेले आहेत. आमच्याकडनं ही तुम्हांला मदत. कुमार सप्तर्षी ह्यांचे चांगले मित्र होते. युक्रांदमधले होते. काम बरोबरीनं करायचे. असे पुष्कळ मित्र होते त्यांचे. कोणी पाय मागे ओढणारा नव्हता. हा आजारी पडला म्हणून त्या सगळ्यांना असं वाटत होतं की हा आजार वाईट, त्यांना त्रास होऊ नये.

 शेवटी डायलिसिस सुरू झालं. डायलिसिस ही भयंकर गोष्ट आहे. डायलिसिस रूममध्ये नेतात. हातावर दोन्ही नसा- रक्त आत आणणारी अन् बाहेर प्रवाह नेणारी अशा जोडल्या जातात. फिश्चुलाचं ऑपरेशन असतं आणि मग दोन्ही नसांमध्ये सुया टोचायच्या, बेडवर झोपायचं, मशीन लावलेलं आहे,

१०० : मी भरून पावले आहे