Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चार माणसांची कमिटी नेमली. नगरकर, शहासाहेब, मी आणि शरद पवार. शहा होते पुण्याला. मी होते मुंबईला. नगरकर होते दिल्लीला आणि पवार येऊन-जाऊन. कुठलाही हमीदचा निर्णय घ्यायचा तर या चौघांना विचारा आणि चौघांना नाही जमलं तर जो त्या वेळी असेल त्याला विचारून करा. पण पाचवा माणूस मध्ये घेऊ नका. आणि बायको सतत आहे ना? मग भाभीनं निर्णय घेतला तरी आम्हांला चालेल. तिनं आपल्या नवऱ्याचा निर्णय खुशाल घ्यावा आणि त्यांना पण असं वाटत होतं की मी निर्णय घेऊ शकेन. शहासाहेब म्हणाले की ती निर्णय घेऊ शकेल. काही हरकत नाही. का, की मी दररोजचा रिपोर्ट सगळ्यांना द्यायची.

 जसलोक हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी आम्ही भाटिया हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा मी शहासाहेबांच्या घरी होते. भाटिया हॉस्पिटल जवळ पडतं म्हणून. जेवायला झोपायला मी शहासाहेबांकडे असायची. रात्री घरी गेल्यानंतर सगळे रिपोर्टस् त्यांना द्यायची. दुसऱ्या दिवशीचा त्यांचा अॅडव्हाइस घेऊन मी दवाखान्यात यायची. जसलोकमध्ये आल्यानंतर रात्रीचे अकरा वाजल्याशिवाय मला घरी जाता यायचं नाही. रात्रीचे रहायला अब्दुल कादीर मुकादम असायचे. त्यांनी दलवाईंची खूप सेवा केली. ते नाही तर कोणी तरी रात्री त्यांच्याबरोबर असायचे. अमीर असायचा, महंमददा असायचे. कोणी तरी असायचे. पण त्यांना यायला वेळ लागायचा. एके दिवशी अशीच रात्रीची शहांकडे यायला निघाले. रस्ता क्रॉस करायला लागले. थोड्या अंतरावर बसस्टॉप. मी बसनं जायची. टॅक्सीनं एवढ्या रात्रीची कशी जाणार? आणि रोज एवढे टॅक्सीचे पैसे कशाला खर्च करायचे? ती बस अगदी घराजवळ उभी राहायची. म्हणून त्या बसनं जायची. तर रस्ता क्रॉस करताना एक टॅक्सी माझ्या मागे लागली. चार माणसं तिच्यात बसलेली. सगळ्यांनी मला घेराव घातला. मी जीव घेऊन धावत सुटले. रस्त्यावर कोणी नव्हतं. मी कसाबसा रस्ता क्रॉस केला. बसस्टॉपवर एकच माणूस उभा होता. त्याच्याकडे गेले आणि म्हटलं, "मला जरा वाचवा. ही टॅक्सी माझ्या मागे लागलीय." त्यानं असं बोलायला सुरुवात केली की जशी मी त्याच्याच बरोबर आहे. ते टॅक्सीवाले थोडा वेळ तिथं उभं राहिले आणि निघून गेले. बस आली आणि आम्ही तिच्यात चढलो. त्या माणसानं मला विचारलं, 'तुम्ही इथं कशाला आलात?' तर म्हटलं, 'माझा नवरा आजारी आहे.' 'नाव काय आहे त्यांचं?' मी म्हटलं, 'हमीद दलवाई.' तर तो म्हणाला, 'पाय पकडतो तुमचे. मी त्यांचा फॅन आहे. मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. फार चांगलं झालं की आज मला तुमची सेवा करायचा चान्स

९८ : मी भरून पावले आहे