पान:मी भरून पावले आहे.pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण आपलं दुःख चारचौघांत सांगायची त्यांना संधीच नसायची. ही संधी या मुस्लिम सत्यशोधकांनी दिली. तलाकपीडित महिलांचे अनुभव ऐकून थक्क झाले होते सगळे लोक.
 ह्या सगळ्या कॉन्फरन्सेस यांच्या हयातीत झाल्या. आता गंमत काय, हा माणूस जगला किती? तेवढ्याच आयुष्यात हे काम त्यांनी केलं. कामाच्या प्रेशरमुळे सुद्धा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असेल. कसं? रात्री-बेरात्री येणं-जाणं, भाषणं करणं, बोलणं, डिस्कशन्स करणं याच्यात सगळी एनर्जी जातच होती.
 कोल्हापूरला तीन दिवसांची शैक्षणिक परिषद घेतली तर ती फार मोठ्या प्रमाणात घेतली होती. मुसलमानांत शिक्षणाबाबत प्रसार करण्याचं काम योजलं होतं. ही परिषद यशस्वी करण्याकरता हुसेन जमादार, सोलापुरे, शिपुरकर आणि श्याम पटवर्धन यांनी खूप मेहनत घेतली.
 कोल्हापूरला ह्यांची तब्येत बिघडली. टूरिस्ट हॉटेलमध्ये राहिलो होतो. तिथंच तब्येत बिघडली, म्हणजे ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागला. काही खाल्लं की उलटी व्हायची. गेल्याबरोबर हे सुरू झालं आणि इतकं प्रकरण वाढलं की डॉक्टर बोलावले. औषध दिलं.
 तिकडे परिषद सुरू झाली. त्यातला पहिला दिवस ह्यांना परिषदेला जाताच आलं नाही आणि मग काही मुसलमानांनी बोलायला सुरुवात केली, "हा भ्याला. त्याची तब्येत बरी नाही असं नाहीए. तो आपल्याला घाबरला आहे. म्हणून तो आपल्यासमोर येत नाही." अमुकतमूक खूप गोष्टी बोलू लागले. आणि तिथले रिपोर्ट हॉटेलमध्ये यायला लागले. मग मी म्हटलं, "आपण जाऊन येऊ या. बघू दे त्यांना.” “पण उभं राहवत नाही. बोलू शकत नाही. मग काय करायचं?" आम्ही त्यांना टॅक्सीमध्ये घालून त्या जागेवर नेलं. तिथं स्टेजवर नेऊन बसवलं. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की खरोखरच त्यांची तब्येत बिघडली आहे. या वेळी त्यांनी थोडंसं भाषण केलं. म्हणजे नावाला ते बोलले. बोलायला त्यांना ताकदच नव्हती. बोलता येत नव्हतं. पण शहासाहेब होते. सुरेश शिपुरकर, श्याम पटवर्धन, सोलापुरे या सगळ्यांनी ती परिषद सांभाळून घेतली. खूप गाजली ती परिषद.

 त्याच्यानंतर काय झालं, हे दौऱ्यावर जायचे. जागरणं व्हायची. खाण्यापिण्याची आबाळ व्हायची. त्यामुळे किरकोळ गोष्टी सुरू झाल्या. ॲसिडिटीचा त्रास खूप वाढला. डॉक्टर गोखले म्हणून होते, माटुंग्याला दवाखाना

९२ : मी भरून पावले आहे