पान:मी भरून पावले आहे.pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि दुसऱ्याच्या बरोबर काँपिटिशनमध्ये उतरू शकतील. मग त्या कॉन्फरन्समध्ये असंही ठरलं की मुस्लिमांनीही त्या त्या प्रांतांची भाषा शिकावी. म्हणजे मी महाराष्ट्रात राहात असेन तर माझी भाषा मराठी झाली पाहिजे, गुजरातमध्ये असेन तर गुजराती झाली पाहिजे, बंगालमध्ये असेन तर बंगाली. मी उर्दू शिकू नये असं नाही. उर्दू ज्यांना शिकायचं त्या सर्वांनी शिकावं पण असं म्हणून चालणार नाहीए की मी मुस्लिम आहे तर माझी भाषा उर्दूच आहे. आणि मी दुसरी भाषा शिकणार नाही. का, तर असं करण्यामुळे आपल्याला नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळणार नाही. म्हणून प्रादेशिक भाषांमध्ये सगळ्यांनी शिक्षण घ्यावं. आणि या कॉन्फरन्समध्ये असंही ठरलं, जी टेक्स्ट बुक्स आहेत शाळांमधली, त्यांचं क्रिटिकल अॅनॅलिसिस झालं पाहिजे, एक्झामिनेशन झालं पाहिजे. त्या पुस्तकांमध्ये काय काय आहे? म्हणजे नुसत्या धार्मिक गोष्टी लिहून मुलांचा ब्रेनवॉश करण्यापेक्षा सगळ्या धर्मांची जर माहिती दिली तर ते मूल बाहेर गेल्यावर सेक्यूलर बनेल. मदरसामध्ये नुसतं धार्मिक शिक्षण दिलं जातं, तर ही मदरसा सिस्टिम बंद करावी. म्युनिसिपालिटीच्या शाळेत गेला तरी मुलगा सेक्यूलर होईल. दुसऱ्या समाजाबरोबर कसं वागायचं ते त्याला समजेल. तर मदरसेवर जास्त भर देऊ नये, असा दलवाईंचा पहिल्यापासून विश्वास होता. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची भूमिकाच ही आहे. त्याचा एकच हेतू असा होता की आपल्या रोजच्या जीवनामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये धर्माला फार महत्त्व असतं. ते हळूहळू कमी करायचं. धर्माचा प्रभाव आपल्या सार्वजनिक जीवनामधून हळूहळू बाजूला करायचा. सगळ्या गोष्टी आपण धर्मावर ठेवून देतो. धर्मावरच जर आपण डिपेंडंट राहिलो तर दुसऱ्या समाजाबरोबर आपण जाणार नाही. वेगळा धर्म म्हणून वेगळी आयडेंटिटी ठेवण्याचं आपल्याला कारण काय आहे? जर भारतामध्ये राहायचं असेल तर सगळ्यांची आयडेंटिटी एक झाली पाहिजे, हा उद्देश ठेवूनच सगळ्या कॉन्फरन्स पार पडल्या.

 महिलांच्या जिथे कॉन्फरन्स झाल्या ना, तिथं त्यांनी उठायचं आणि आपले अनुभव सांगायचे, अशाच झाल्या. आता अमरावतीलासुद्धा कॉन्फरन्स झाली. तिथं बायकाच बोलल्या नि ते खूप प्रभावी झालं. त्याच सांगत होत्या की आम्हांला तलाक कसा दिला, नवऱ्यांनी कसं सोडलं, आम्ही कसं बाहेर पडलो. या कॉन्फरन्समागे एकच हेतू होता की, लोक म्हणायचे की तलाकचा प्रश्नच नाहीए. एरवी महिला बोलत नाहीत, त्यांना बोलतं करण्यासाठी खास कॉन्फरन्स घेऊन त्यांना चान्स दिला होता. मुस्लिम महिला बाहेर येऊन बोलल्या असंही पहिल्यांदाच झालं.

मी भरून पावले आहे : ९१