त्यांचा. फार चांगले मित्र होते ह्यांचे. सुरुवातीपासून त्यांचंच औषध हे घ्यायचे. त्यांनी औषध चालू केलं. पण दुखणं खूप वाढत गेलं. म्हणजे प्रत्येक वेळी टूरवरून आले की दोन दिवस ते आजारी असायचे. डॉक्टरचं औषध घेतलं की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. परत त्रास व्हायचा. जळजळ, खाल्लेलं न पचणं, काही खावंसं न वाटणं. म्हणजे नुसती उलटीच होते असं नाही. जळजळ होणं आणि दूध घेतलं की बरं वाटणं. जरासुद्धा तेलकट नको, तुपकट नको, काही नको असं. उलटीचं सेन्सेशन होणं, हे सगळं सुरू झालं होतं. जयसिंगपूरचे सा.रे.पाटील हे दलवाईंचे मित्र होते. त्यांनी दलवाईंना हवापालटाकरता बोलावलं. आपल्या गावात एक घर घेऊन दोन महिने तिथं आम्हा दोघांना ठेवलं. भांड्याकुंड्यांची, नोकरचाकरांची औषधपाण्याची व्यवस्था केली. अतिशय आपुलकीनं त्यांनी हे सारं केलं. मग एक दिवस तर असं झालं की, त्यांची तब्येत फारच बिघडली. त्या वेळी माझी धाकटी नणंद आली होती. आयेशा. आणि घरात सगळी होती. हुसेन होता, त्याची बायको होती. मी ऑफिसात गेले होते आणि हे फोन घ्यायला गेले. फोनवर बोलता बोलता चक्कर आली आणि ते पडले खाली. खाली पडले तर घरातल्या लोकांनी उचलून घातलं पलंगावर. पण कोणी घरी डॉक्टर बोलावला नाही. मी संध्याकाळी आले जेव्हा घरी, तेव्हा ह्यांच्याभोवती सगळे जमा झालेले दिसले. म्हणून मी विचारलं, "काय झालं?" तर दादांचं असं असं झालं." "झालं ना. मग इथं डॉक्टर आहे, कोणी डॉक्टर आणला का?" "नाही." "मग सगळ्यांनी काय केलं? म्हटलं, त्यांनी लाख सांगितलं असेल, पण तुम्ही नको का डॉक्टरला बोलवायला?" मग मी गेले. डॉक्टर भटना घेऊन आले. त्यांनी तपासलं. औषध दिलं. औषध दिल्यानंतर ते म्हणाले की हे औषध घेऊन बघा. पण दलवाईंचं दुखणं काही बरोबर वाटत नाहीये. तुम्हांला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल त्यांना. ते झाल्यानंतर एक दिवस लघवी बंद झाली. लघवी बंद झाल्याबरोबर त्रास व्हायला लागला. ते सकाळपासून बेचैन झाले. महंमद दलवाईंना मी बोलावून आणलं. तेच जवळ राहत होते. मग मी डॉ. प्रधानांना बोलावलं. विचारल्यानंतर ते म्हणाले, "ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा." "कुठल्या हॉस्पिटलमध्ये घालायचं?" ते म्हणाले, "नानावटी हॉस्पिटल चांगलं आहे. आपल्या घराजवळ पडेल.” तर मी म्हटलं, "नको बाबा, नानावटी हॉस्पिटलचा रिपोर्ट काही चांगला नाहीये. आमच्या ऑफिसमधली किती माणसं गेलेली परत आली नाहीत. आपल्याला ते नको. चांगला दवाखाना पाहिजे. लांब असला, मला त्रास झाला तरी चालेल."
मी भरून पावले आहे : ९३